दोन महिन्यांत वणव्याच्या १७१ घटना

By Admin | Updated: April 19, 2017 00:11 IST2017-04-19T00:11:38+5:302017-04-19T00:11:38+5:30

वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनांना आग लावण्याचे प्रमाण मोठे आहे. जंगलात आग लागू नये यासाठी

171 events in two months | दोन महिन्यांत वणव्याच्या १७१ घटना

दोन महिन्यांत वणव्याच्या १७१ घटना

२७० हेक्टर जंगल जळाले : फायर लाईनचे २७ लाख पाण्यात
नरेश रहिले  गोंदिया
वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनांना आग लावण्याचे प्रमाण मोठे आहे. जंगलात आग लागू नये यासाठी वनविभागाला सर्तक राहण्याचा इशारा दिला जातो. परंतु वनाधिकारी, कर्मचारी सतर्क राहूनही १५ फेब्रुवारी पासून ९ एप्रिल या दोन महिन्यापेक्षा कमी काळात गोंदिया जिल्ह्यात वणव्याच्या १७१ घटना घडल्या आहेत. त्यात २७०.४३२ हेक्टर जंगल जळाले आहे.
वनांना आग लागू नये यासाठी वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्या वनांचे मालकत्व गावकऱ्यांनीच पत्करावे यासाठी ग्रामवनची संकल्पना पुढे आणण्यात आली. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील वनांना आग लागण्याच्या घटना कमी होतांना दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात नवेगावबांध जंगलात चार ठिकाणी आग लागली व त्यात चार हेक्टर जंगल जळाले. अर्जुनी-मोरगाव व आमगाव येथे वणव्याची प्रत्येकी एक घटना असून त्यात प्रत्येकी एक हेक्टर जंगल जळाले.
मार्च महिन्यात गोरेगाव क्षेत्रात एका घटनेत दोन हेक्टर जंगल जळाले. तिरोडा क्षेत्रात सात घटनांत ४.७५ हेक्टर, आमगाव क्षेत्रात दोन घटनांत सहा हेक्टर, उत्तर देवरी क्षेत्रात १३ घटनांत १७.५० हेक्टर, गोठणगाव क्षेत्रात १९ घटनांत २५.४० हेक्टर, चिचगड क्षेत्रात २२ घटनांत २१.९६८ हेक्टर, नवेगावबांध क्षेत्रात २७ घटनांत ३५.५० हेक्टर, दक्षीण देवरी क्षेत्रात १० घटनांत १९.७० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात १३ घटनांत २३.०५ हेक्टर, सालेकसा क्षेत्रात नऊ घटनांत १९.०५ हेक्टर, सडक-अर्जुनी क्षेत्रात तीन घटनांत १२.९५ हेक्टर, गोंदिया क्षेत्रात सहा घटनांत ४.५०० हेक्टर वनांना आग लागली.
एप्रिल महिन्यात तिरोडा क्षेत्रात चार घटनांत पाच हेक्टर, सडक-अर्जुनी क्षेत्रात सात घटनांत ३१.८६ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात पाच घटनांत १३ हेक्टर, गोंदिया क्षेत्रात दोन घटनांत ३.५० हेक्टर, गोठणगाव क्षेत्रात दोन घटनांत ३.२५ हेक्टर, नवेगावबांध क्षेत्रात पाच घटनांत ६.५० हेक्टर, चिचगड क्षेत्रात दोन घटनांत ०.९५४ हेक्टर, सालेकसा क्षेत्रात दोन घटनांत ४.२० हेक्टर, दक्षीण देवरी क्षेत्रात पाच घटनांत ३.८० हेक्टर वनांना आग लागली. ९ एप्रिल नंतर लागलेल्या आगींची माहिती वनविभागाला अजून उपलब्ध झालेली नाही.

नुकसानीची लपवाछपवी
आगीत किती वनसंपदेचे नुकसान झाले यासंदर्भात विचारणा केली असता वनाधिकारी व कर्मचारी नुकसानीचा आकडा लपवितात. आपल्या विभागावर खापर फोडले जाऊ नये यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत फक्त पाला-पाचोळा जळाल्याची माहिती देतात. मात्र नुकसानीची खरी माहिती शासनालाही पोहचत नाही. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये या भितीने नुकसान दाखविले जात नाही.
फायर लाईनचे २७ लाख गेले कुठे?
जंगलात आग लागू नये याकरिता फायर लाईन कापण्यासाठी शासनाकडून सर्व विभागाला निधी दिला जातो. परंतु हा निधी वनाधिकारी हडपत असल्याने वनांना आग लागण्याच्या घटना घडतात. गोंदिया जिल्ह्याला फायरलाईन करीता एकदा १० लाख रूपये व दुसऱ्यांदा १७ लाख ५६ हजार रूपये देण्यात आले. हे पैसे संबधित वनाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले असतांनाही आग लागतात कशा हे न सुटणारे कोडे आहे.

 

Web Title: 171 events in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.