१६००० हजार कोव्हिशिल्ड मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:43+5:302021-07-07T04:35:43+5:30
गोंंदिया : जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यात मंगळवारी (दि.६) लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता; मात्र मंगळवारी रात्री १६००० ...

१६००० हजार कोव्हिशिल्ड मिळणार
गोंंदिया : जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यात मंगळवारी (दि.६) लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता; मात्र मंगळवारी रात्री १६००० कोव्हिशिल्डचा पुरवठा केला जाणार आहे. परिणामी, बुधवारी (दि.७) लसीकरण सुरू होणार आहे.
कोरोना लस घेतल्यानेच आपण सुरक्षित राहू शकतो, याबाबत आता नागरिकांना समजून येत आहे. परिणामी, नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढत आहे. शिवाय १८-४४ गटातील लसीकरण सुरू झाल्याने तरुणांची गर्दी केंद्रांवर वाढत असून, दररोजच्या लसीकरणाची आकडेवारी २१००० पर्यंत पोहोचली आहे. परिणामी, जिल्ह्यात आता लसींचा साठा लवकरच संपत आहे. दुसरीकडे लसींचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लसीकरणाला वारंवार ब्रेक द्यावा लागत आहे.
विशेष म्हणजे, शुक्रवारी मिळालेल्या २६६०० लसींचा साठा सोमवारीच संपल्याने मंगळवारी (दि.६) लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला. असे असतानाच मंगळवारी सायंकाळी १६००० कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. यामुळे बुधवारी लसीकरण होणार असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------
गुरुवारचे लसीकरण वांद्यातच
जिल्ह्यात सध्या १८-४४ गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावले असून, अन्य नागरिकांची संख्या बघता लसीकरणाची आकडेवारी दिवसाला २०००० हजारांवर जात असल्याचे दिसत आहे. म्हणजेच, मंगळवारी मिळणारे १६००० डोस बुधवारीच संपून जाणार किंवा त्यातील मोजकेच डोस उरणार असे दिसते. अशात गुरुवारी लसीकरणाचे काय, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो.