१६ हृदयरुग्णांना देणार नवजीवन
By Admin | Updated: March 26, 2015 01:13 IST2015-03-26T01:13:48+5:302015-03-26T01:13:48+5:30
तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २९ मुला-मुलींची हृदयरोग तपासणी करण्यात आली.

१६ हृदयरुग्णांना देणार नवजीवन
गोंदिया : तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील २९ मुला-मुलींची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात सर्वच मुला-मुलींची निवड पुढील तपासणीसाठी करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात त्यांना दोन अॅम्बुलंसद्वारे नागपूरला पाठविण्यात आले. तेथील तपासणीत १६ मुलांना जन्मापासूनच हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बाल रोग तज्ज्ञ डॉ. रेखा दुबे यांनी सर्व २९ मुला-मुलींची तपासणी केली व २ डी इको तपासणीसाठी निवड केली. सर्व मुलांची प्राथमिक तपासणी डॉ. प्रिया ताजने, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. निलेश लोथे, डॉ. डोंगरे यांनी केली होती.
यानंतर दोन अम्बुलंसची व्यवस्था करून मंगळवार (दि.२४) रोजी सकाळी ९ वाजता पुढील तपासणीसाठी सर्वांना नागपूरला रवाना करण्यात आले. नागपूर येथील श्रीकृष्णा हृदयालया अॅण्ड क्रिटिकल केअर सेंटरचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. महेश फुलवानी यांनी २ डी इको तपासणी केली. यात १६ मुलांना जन्मापासून हृदयरोग असल्याचे उघड झाले. तर काही मुलांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे मुलांचे जीव वाचविण्यास मदतच झाली.
राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मुला-मुलींच्या हृदयरोग तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
काही मुलांना त्वरित शस्त्रक्रियेची गरज
राष्ट्रीय किशोर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातून २९ मुलामुलींना हृदयरोगाच्या २ डी इको तपासणीसाठी नागपूर येथील श्रीकृष्णा हृदयालया अॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर येथे पाठविण्यात आले होते. तेथील तपासणीत २९ पैकी १६ मुलांना जन्मापासूनच हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. आता यापैकी काही मुलांना गंभीर स्वरूपाचे हृदयरोग असून त्यांना त्वरित शस्त्रक्रियेची गरज पडू शकते, असे तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले.