आचारसंहिता उल्लंघनाच्या १६ प्रकरणांची नोंद
By Admin | Updated: September 30, 2014 23:38 IST2014-09-30T23:38:23+5:302014-09-30T23:38:23+5:30
विधानसभा निवडणुकीची आचार संहिता १२ सप्टेंबरपासून लागली. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आचार संहिता उल्लंघन करणारे १६ प्रकरणे नोंद करण्यात आले. यापैकी सहा प्रकरणांत

आचारसंहिता उल्लंघनाच्या १६ प्रकरणांची नोंद
गोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता १२ सप्टेंबरपासून लागली. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आचार संहिता उल्लंघन करणारे १६ प्रकरणे नोंद करण्यात आले. यापैकी सहा प्रकरणांत विविध पोलीस ठाण्यांतर्गत २६ लाख २४ हजार ८०० रूपये जप्त करण्यात आले. तसेच १० प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.
१९ सप्टेंबर रोजी भरारी पथकाच्या तपासणीदरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत पाच लाख ५० हजार रूपये, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत चार लाख ९७ हजार, २३ सप्टेंबर रोजी तिरोडा-तुमसर मार्गावर तीन लाख रूपये, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हरदोली नाक्यावर १० लाख रूपये, २५ सप्टेंबरला गोरेगाव ठाण्यांतर्गत दोन लाख रूपये व २७ सप्टेंबरला गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७७ हजार ८०० रूपये रोख जप्त करण्यात आले.
या सर्व प्रकरणांची तक्रार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित ठाण्यांत नोंदविल्या आहेत. आचार संहिता उल्लंघनाच्या प्रकरणांत १२ सप्टेंबर रोजी गोंदिया शहरात वर्तमान पत्रात विनापरवानगी पत्रके वाटण्यात आली. १९ सप्टेंबरला अर्जुनी/मोरगाव येथे निवडणूक पत्रके दुकानाच्या समोर व नवेगावबांध ग्रामपंचायतीच्या मुख्य दारावर लावण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली. २१ सप्टेंबर रोजी अर्जुनी/मोरगावात जवळपास एक लाख ३९ हजार रूपयांची ५४४ लिटर दारू व जवळपास चार लाख रूपयांची टाटा सुमो जप्त करण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रात मुद्रक व प्रकाशकाच्या नावाविनाच पत्रके मिळाल्याची तक्रार, गोंदियात एक हजार रूपयांची देशी दारू व २५ हजार रूपयाची दुचाकी जप्त करण्याच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली.
२४ सप्टेंबर रोजी आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत कुंभारटोली येथे मंजुरीविनाच सभा घेतल्याची तक्रार मिळाली आहे. २५ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रांतर्गत विना मुद्रक व प्रकाशकाचे नावाचे निवडणुकीचे फलक (बोर्ड) लावण्याची तक्रार नोंद करण्यात आली. तिरोड्याच्या चिखली गावात २० लिटर दारू, एक हजार रूपये रोख व एक दुचाकी वाहन असे एकूण ४० हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.