१५ गावातील पाणी टंचाई झाली दूर
By Admin | Updated: May 10, 2014 00:20 IST2014-05-10T00:20:24+5:302014-05-10T00:20:24+5:30
गेल्या १० आॅक्टोबर २०१३ पासून तर ३१ मार्चपर्यंत अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. यामुळे १५ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता.

१५ गावातील पाणी टंचाई झाली दूर
गोठणगाव : गेल्या १० आॅक्टोबर २०१३ पासून तर ३१ मार्चपर्यंत अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. यामुळे १५ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. पण ऐन उन्हाळ्यात आता ही योजना सुरळीत सुरू असल्यामुळे गावकर्यांची पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी आणि शिरेगावबांध येथील पाणी पुरवठा योजना आधीपासून सुरळीत होत्या. मात्र रामपुरी आणि अर्जुनी मोरगाव या योजना बंद होत्या. त्यापैकी रामपूरी येथील पाणी पुरवठा योजना मार्चपासून सुरू झाली. मात्र वीज बिलाची मोठी रक्कम थकित असल्यामुळे पाच महिने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळातर्गंत तालुक्यातील एकूण १५ गावांना शुध्द पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र विद्युत बील जास्त झाल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. गावातील समितीने पाठपुरावा केला. खांबी, चिरेगावबांध आणि अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाच्या पदाधिकार्यांनी उपोषण सुरू केले होते. आ.राजकुमार बडोले यांनीही भेट देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. पण तरीही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नंतर आ.बडोले यांनीही आंदोलनात्मक पवित्रा घेतला. त्यानंतर जि.प.सीईओंनी जिल्हा परिषदेच्या फंडातून ८ लाख ३७ हजार रुपयांची व्यवस्था करून थकित वीज बिल भरण्याची सोय करून दिली. अखेर भर उन्हाळ्यात पाण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पाणी पुरवठा बंद असता तर १५ गावांमधील नागरिकांना उन्हात पाच कि. मी. अंतरावर भटकंती करावी लागत होती. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण शहरी व ग्रामीण योेजनेतर्गंत गोठणगावला इटियाडोह धरणाचे पाणी शुध्दीकरण करुन पाणी पुरवठा करण्याकरिता १९ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली होती. यानंतर सदर योजनेचे हस्तांतरण ८ सप्टेबंर २०१२ पासून अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाकडे करण्यात आले. या योजनेच्या हस्तांतरणा दरम्यान प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने योजनेतील बर्याच त्रृटी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांसमोर ठेवल्या होत्या. यामध्ये इटियाडोह येथे बांधण्यात आलेल्या विहिरीवर जी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. ती सदोष पूर्ण असून यापैकी बरेच पाईप मातीत दबले असल्याने अनेकदा पाणी पुरवठ्यात अडचण निर्माण होत असते. तसेच एखाद्या ठिकाणी पाईप लाईन लिकेज असल्यास पाईपचा शोध घेण्यास देखील बराच त्रास सहन करावा लागतो. योजनेच्या हस्तांरणाच्या वेळी कालवा तयार करण्याची देखील मागणी करण्यात आली होती. मात्र तेव्हा महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांनी या समस्यांकडे दुलर्क्ष केले. ही योजना आता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.