१५ बालकांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:21+5:302021-02-10T04:29:21+5:30
गोरेगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने ९ ते १२ फेब्रुवारी या काळात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

१५ बालकांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात
गोरेगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने ९ ते १२ फेब्रुवारी या काळात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत, दोन दिवस वीटभट्ट्यांवरील स्थलांतरित बालके, तर दोन दिवस ड्रॉप बॉक्समधील पेंडिंग विद्यार्थ्यांचा शोध घेणे आहे. मात्र मोहिमेच्या पहिल्याच दिवशी येथे १५ बालकांचा शोध घेण्यात आला असून, त्यांना येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
येथील गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती (बालरक्षक) सुनील ठाकूर, सतीश बावनकर व भाष्कर बाहेकार यांनी येथील बसस्थानकामागे वाशीम जिल्ह्यातून आलेल्या खारीक-बदाम खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील १५ शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एम. पी. शेख यांना अवगत करून देण्यात आले आहे. या कुटुंबातील माहेक अनिल धुर्वे ही विद्यार्थिनी मागील सत्रात येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दाखल होती. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत स्थलांतरित झाल्यानंतर पुन्हा महेक शाळेत दाखल होणार असल्याने गटसाधन केंद्र कर्मचारी व शाळा मुख्याध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे. ही सर्व बालके वाशीम जिल्ह्यातील काजळेश्वर व कारंजा-लाड येथील असून, ज्ञानप्रकाश विद्यालय (कारंजा-लाड) येथे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. या कुटुंबातील नेहा राम कोडापे ही विद्यार्थिनी अकरावीला असून, ती दहावीत ७२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती; तर सुधीर ७० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले.