१४० कॅमेऱ्यांची वाघांवर ‘नजर’
By Admin | Updated: April 28, 2015 00:49 IST2015-04-28T00:49:58+5:302015-04-28T00:49:58+5:30
नव्याने अस्तित्वात आलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील वाघांना कोणाची ‘नजर’ लागू नये, आणि त्यासाठी

१४० कॅमेऱ्यांची वाघांवर ‘नजर’
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : जुन्या १०५ कॅमेऱ्यांचे सेंसर झाले खराब
देवानंद शहारे ल्ल गोंदिया
नव्याने अस्तित्वात आलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील वाघांना कोणाची ‘नजर’ लागू नये, आणि त्यासाठी त्यांच्यावर सतत नजर राहावी यासाठी १४० कॅमेरे २४ तास कार्यरत आहेत. मात्र प्रत्यक्षात हे कॅमेरे अपुरे असून आणखी कॅमेरे मिळविण्यासाठी नियोजन केले जात आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगाव सिनरी, कोका, नागझिरा व नवीन नागझिरा अभयारण्य मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी मिळाली. शासनाच्या आदेशानुसार वाघांची संख्या कळावी म्हणून उत्कृष्ट अशा १४० कॅमेऱ्यांतून ट्रॅपिंग सुरू करण्यात आली आहे. सध्या तीन ठिकाणच्या ट्रॅपिंग पूर्ण झाल्या असून दोन ठिकाणी बाकी आहेत.
मागील तीन वर्षांपासून तेच कॅमेरे ट्रॅपिंगसाठी वापरले जात आहेत. दर तीन वर्षांनी हे कॅमेरे बदलावे लागते. मात्र निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे यंदासुद्धा जुन्याच कॅमेऱ्यांमधून टॅपिंग करणे सुरू आहे. या जुन्या कॅमेऱ्यांपैकी १४० कॅमेरे उत्कृष्ट असल्यामुळे त्यांचाच उपयोग वाघांच्या ट्रॅपिंगसाठी केला जात आहे. सद्यस्थितीत १०५ कॅमेरे नादुरूस्त आहेत. त्यांचे सेंसर पूर्णत: निकामी झाले असून आता ते कोणत्याच उपयोगाचे नाहीत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पूर्ण क्षेत्र ६५६ चौरस किमी आहे. २०० हेक्टरच्या क्षेत्रासाठी दोन जोडी कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. कॅमेरे एका ठिकाणी २० दिवसांसाठी लावले जातात. त्यानंतर तेथून काढून तेच कॅमेरे दुसऱ्या क्षेत्रात लावले जातात. वाघांची खरी संख्या व शास्त्रोक्त माहिती मिळवून घेण्यासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. या कॅमेऱ्याद्वारे वाघांच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे व संख्या प्राप्त होते. त्यानंतर ते छायाचित्र वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट आॅफ इंडिया येथे पाठविले जाते. तेथे त्या वाघांना विशिष्ट आयडी दिला जातो.
या कॅमेऱ्यांद्वारे नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहितीसुद्धा मिळते. शिवाय जंगलात शिरणारी गावरान कुत्रे, गुरे किंवा मनुष्य यांचीही माहिती मिळते. मात्र हे कॅमेरेसुद्धा चोरी होतात. आतापर्यंत पाच ते सहा कॅमेरे चोरी झाले आहेत. याची तक्रारही पोलिसांत करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. परंतु हे कॅमेरे लोकांसाठी कसल्याही उपयोगाचे नसतात.
दरवर्षी फेज-४ प्रगणक वाघांची संख्या काढण्यासाठी केली जाते. सध्या ही कॅमेरा ट्रॅपिंग नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगावबांध सिनरी व कोका अभयारण्य इत्यादी क्षेत्रात करण्यात आली आहे. आता नवीन नागझिरा अभयारण्यात ट्रॅपिंग सुरू आहे. येथे २० दिवस पूर्ण होताच येथील कॅमेरे काढून जुन्या नागझिरा अभयारण्यात कॅमेरे लावून ट्रॅपिंग सुरू केली जाणार आहे. त्यानंतरच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची योग्य संख्या कळणार आहे.
कॅमेऱ्यांसाठी चार लाखांचा निधी उपलब्ध
नवीन कॅमेरे विकत घेण्यासाठी यंदा चार लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जवळपास १५ हजार रूपयांचा एक कॅमेरा असून लवकरच ते खरेदी करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे भारतात बनत नसून विदेशातून मागविले जातात. शिवाय हे कॅमेरे एकदाच उपयोगात येतात. एकदा बिघडले की त्यांची दुरूस्ती केली जावू शकत नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
आठ मोठे वाघ व तीन पिले ट्रॅप
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नवेगाव सिनरी व कोका अभयारण्य या तीन क्षेत्रात कॅमेऱ्यांतून वाघांची ट्रॅपिंग पूर्ण झालेली आहे. नवीन नागझिऱ्यात सुरू असून त्यानंतर नागझिरा अभयारण्यात करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या ट्रॅपिंगमध्ये आठ मोठे वाघ व तीन पिलू असे एकूण ११ वाघ आढळले आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची पूर्ण ट्रॅपिंग झाल्यावर वाघांची योग्य संख्या कळणार आहे. नागझिरा येथील एक वाघीन नवेगावबांध येथील ट्रॅपिंगमध्ये आढळली आहे. वन्यजीव इतरत्र भटकत असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.