१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: December 15, 2014 22:58 IST2014-12-15T22:58:50+5:302014-12-15T22:58:50+5:30
धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट

१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गोंदिया : धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते आत्महत्येच्या वाटेने जात नाहीत. मात्र यावर्षी गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणासह इतरही कारणे असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवर्षीच होत असतात. मात्र यावर्षी आत्महत्यांचे हे प्रमाण वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्याच्या चिंगी येथील नानाजी श्रीपत रहिले (४०) या शेतकऱ्याने १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव तालुक्याच्या चांदीटोला येथील धनलाल कुशन सोनटक्के (६५) यांनी ३१ मार्च रोजी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील बालकदास धर्मा खोब्रागडे (५२) या शेतकऱ्याने २० एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदिया तालुक्याच्या सावरी येथील कपूरचंद यशवंत बिसेन (४७) यांनी २३ एप्रिल रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या बकी/मेनडकी येथील येथील मुलचंद महागू मेश्राम (६५) यांनी ६ मार्च रोजी विषप्राशन करून, तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील तानसेन दुर्गा परिहार (४८) यांनी १५ मे रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या पालांदूर/जमी. येथील सदाशिव फुकटू सोरले (४४) या शेतकऱ्याने २५ मे रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रेमचंद सुखराम भोवते यांनी २५ मे रोजी विष पा्रशन करून, देवरी तालुक्याच्या मुरपार येथील किशोर बिसन लटये (३४) यांनी ११ जून रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या शिरपूरबांध येथील पुरूषोत्तम बळीराम मेंढे यांनी १८ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या निमगाव येथील गोपाल मसाजी ठाकरे यांनी १७ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रकाश रामाजी टेंभरे (४६) यांनी १४ जुलै रोजी विषप्राशन करून, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या खोकरी येथील चंदू उरकुडा निंबार्ते(७०) यांनी ७ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून तर गोंदिया तालुक्याच्या मोगर्रा येथील झनकलाल सदाराम पटले (४५) यांनी १५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या आत्महत्या नेमक्या कशामुळे झाल्या आहेत याची चौकशी सुरू आहे. काही आत्महत्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे सिद्धही झाले आहे. यावर्षी शासनाच्या धान खरेदीला उशिर झाला. भावातही उत्पादन खर्चावर आधारित वाढ झाली नाही. गतवर्षी मिळालेला बोनसही यावर्षी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)