ते १४. ७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:15+5:302021-05-27T04:31:15+5:30

गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक-१ वर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ...

To 14. 74 lakh from Raipur | ते १४. ७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

ते १४. ७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक-१ वर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी सोमवारी (दि.२४) दुपारी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संजू मंगल बेहरा (३५,रा. तरुणनगर, रायपूर, छत्तीसगड) कडे असलेले १४ लाख ७४ हजार रुपये रायपूर येथील व्यापाऱ्याचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. येथील एका कमल नावाच्या व्यक्तीकडून ती रक्कम घेतल्याचे प्रथम दर्शनी तपासात पुढे आले आहे.

गोंदिया रेल्वे पोलीस रेल्वेस्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना त्यांना संजू बेहरा संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन आढळला. फलाट क्रमांक-१ वर उभ्या असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले. संजू बेहरा याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ २०००, ५०० व १०० रुपयांच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास गोंदिया व नागपूरचे आयकर विभाग करीत असून, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जप्त करण्यात आलेली ती रक्कम गोंदिया रेल्वे पोलिसांनी सील करून आपल्या ताब्यातच ठेवावी, असे पत्र गोंदिया रेल्वे पोलिसांना दिले आहे. रायपूरच्या मालकाने आपला नोकर संजू बेहरा याला गोंदियातून पैसे आणण्यासाठी सांगितले; परंतु ती रक्कम किती आहे, याची माहिती त्याला दिली नव्हती. गोंदियातील विविध लोकांकडून गोळा केलेली ती रक्कम संजू बेहरा रायपूरला नेत होता.

Web Title: To 14. 74 lakh from Raipur