तंबाखु खाणाऱ्या १३८ जणांना ७४ हजाराचा दंड; वर्षभरात १८ कार्यालयात घातली धाड
By नरेश रहिले | Updated: May 26, 2025 20:16 IST2025-05-26T20:16:18+5:302025-05-26T20:16:49+5:30
आरोग्य विभागाच्या अंमलबजावणी पथकाने सन २०२४-२५ या वर्षात तब्बल १८ कार्यालयात धाडसत्र राबवून १३८ लोकांना तंबाखू खातांना पकडले. या कारवाईत तब्बल ७४ हजार २० रूपये दंड आकारून ती रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली.

तंबाखु खाणाऱ्या १३८ जणांना ७४ हजाराचा दंड; वर्षभरात १८ कार्यालयात घातली धाड
गोंदिया: जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तंबाखुमुक्त व्हावे यासाठी त्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अंमलबजावणी पथकाने सन २०२४-२५ या वर्षात तब्बल १८ कार्यालयात धाडसत्र राबवून १३८ लोकांना तंबाखू खातांना पकडले. या कारवाईत तब्बल ७४ हजार २० रूपये दंड आकारून ती रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली.
या कारवाईत आरोग्य विभागाने १७ हजार ६२० रुपयांचा दंड तर पोलीस विभागाने ६ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक गोरख भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित सहकार्याने तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २००३ अंतर्गत उपलब्ध मनुष्यबळात विविध दंडात्मक कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यात के.टी.एस.शासकीय सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचे अंमलबजावणी पथक कार्यरत आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकात जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे, दंतरोग तज्ञ डॉ.अमोल राठोड, जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे हे विविध कार्यालयात धाडसत्र राबवून कोटपा कायदाची जनजागृती करीत आहेत.
येथे राबविणार धाडसत्र
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर परिषद,तहसिल कार्यालये,पोष्ट ऑफिस,वन विभाग,आरोग्य संस्था, बॅंका,सहकारी संस्था यांचे सह विविध कार्यालयात झाडाझडती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी सुद्धा पंचायत समिती कार्यालये, शाळा,ग्रामपंचायत तंबाखुमुक्त करण्यासाठी वेगवेगळे पथकांची निर्मितीवर भर देऊन धाडसत्र राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अंमलबजावणी पथकाला दिल्या आहेत.