१३७ शस्त्रक्रियांनी दिले नवजीवन
By Admin | Updated: March 6, 2015 01:43 IST2015-03-06T01:43:47+5:302015-03-06T01:43:47+5:30
जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २६ डिसेंबर २०१४ पासून महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.

१३७ शस्त्रक्रियांनी दिले नवजीवन
गोंदिया : जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २६ डिसेंबर २०१४ पासून महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण १३७ शस्त्रक्रिया व इतर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले आहे.
आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रान्वये राज्यात २६ फेब्रुवारी २०१५ ते १२ मार्च २०१५ पर्यंत महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ३ ते ७ मार्च २०१५ पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांचे उच्च रक्तताप (हायपरटेंशन), मधुमेहासाठी रक्त तपासणी, कर्करोग निदानासाठी गर्भाशय, स्तनांचा, मुखाचा कर्करोग तसेच मौखिक आरोग्याबाबत महिलांची तपासणी करण्यात येत आहे. सदर शिबिर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. शिबिर आयोजित करताना प्रत्येक आरोग्य संस्थांना त्यांची कार्यक्षेत्र वाटून देण्यात आली आहेत. त्यांच्या हद्दीतील १० ते १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील लोकसंख्या दर्शविण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यासाठी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवित असलेल्या जिल्ह्यांनी २५ हजार महिलांची कर्करोग, उच्च रक्तताप व मधुमेह आजारासाठी तपासणी करावयाची आहे.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २३ शस्त्रक्रिया (सिझेरियन), कुटुंबकल्याणच्या ५३ शस्त्रक्रिया, ६१ मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अनेक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सिझेरियन व कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची तपासणी, दंत व नेत्र तपासणी, जेएसएसके, जेएसएसवाय, मानव विकास योजनांचा लाभ दिला जात आहे. गरजू महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत रविवारी ८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात ३० वर्षांवरील सर्व महिलांची मोफत तपासणी करण्यात येईल. गर्भाशय व तोंडाचा कर्करोग, उच्च रक्तताप, मधुमेह, सिकलसेल, डोळे व रक्तक्षयाची तपासणी होणार आहे. त्यासाठी फॉग्सी संघटनेचे स्त्रि रोग तज्ज्ञ ‘कोल्पोस्कोपी व पॅप्सस्मियर’ची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून गर्भशयाचे कर्करोग निदान झाल्यास तसेच संदर्भिय उपचार सेवा देण्यात येणार आहे. महिला जागृतीवर प्रोजेक्टरमार्फत पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर परिषद तिरोडा, तिरोडा मेडीकल असोसिएशन, महिला मंडळे, अदानी फाऊंडेशन, लॉयन्स क्लब यांचे सहकार्य लाभत आहे.
महिला आरोग्य अभियाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात डॉ. शेफाली जैन, डॉ. सुनिता लढ्ढा, डॉ. स्वाती विद्यासागर, डॉ. संजय ज्ञानचंदानी, डॉ. दुर्गाप्रसाद पटले, डॉ. आशिष झरारिया, डॉ. रेखा दुबे, डॉ. चंद्रशेखर पारधी, डॉ. संजय भगत, डॉ. प्राची मिश्रा, डॉ. नागेश शेवाळे, डॉ. सीमा काळे, डॉ. सोनम लढ्ढा, डॉ. स्मिता राऊत, डॉ. अनिल डांगे, डॉ. कंचन रहांगडाले, डॉ. प्रिया ताजने, डॉ. प्रांजली पेटकर, डॉ. बोर्डेलिया व डॉ. गहेरवार सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)