१२६३ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:02 IST2018-07-23T22:01:53+5:302018-07-23T22:02:30+5:30
जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

१२६३ घरांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे १२६३ घरांची पडझड झाली. तर गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नागरिकांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर ११२३ घरांचे अशंत: नुकसान झाले. १२९ जनावरांचे गोठे सुध्दा कोसळल्याने पशुपालकांना आर्थिक फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा तालुक्यातील नागरिकांना बसला. पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये गोंदिया २२६, तिरोडा, ८५, गोरेगाव २८४, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ४५, आमगाव ३०६, सालेकसा ५९, सडक अर्जुनी ४७ घरे पडून नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ११, तिरोडा ४, अर्जुनी मोरगाव १, देवरी तालुक्यातील १ असे एकूण १६ घरे पूर्णपणे कोसळल्याने कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. जिल्हा प्रशासनाने ११२२ पैकी केवळ ५९७ घरांचे नुकसान भरपाई देण्याचा अहवाल तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक जण शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाचा अहवाल भोवणार
जिल्ह्यात १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी व धानाची पºहे वाहून गेली. तर पावसामुळे बांध्या फुटल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र कृषी विभागाने पावसामुळे शेतीचे कोणतेच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.
प्रकल्पांतील पाणी साठ्यात वाढ
१५ ते १७ जुलै दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी गाठल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.