१२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By Admin | Updated: February 27, 2017 00:11 IST2017-02-27T00:11:06+5:302017-02-27T00:11:06+5:30
जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ४८ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

१२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ४८ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि.२६ रोजी जिल्ह्यातील ९७ केंद्रांवरुन दिली. पाचवीतील १२२ विद्यार्थी तर आठवीतील १७५ विद्यार्थी गैरहजर होते.
जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांचे मिळून वर्ग पाचवीचे ६ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ५२ केंद्रांवरुन परीक्षा देणे अपेक्षित होते. परंतु ६ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर १७५ विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच वर्ग आठवीचे ५ हजार ५२९ विद्यार्थी ४५ केंद्रांवरुन परीक्षा देणे अपेक्षित होते. परंतु ५ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १२२ विद्यार्थी या परिक्षेत गैरहजर होते.
सकाळी १०.३० पासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत चाललेल्या या परीक्षेत इयत्ता पाचवीकरिता प्रथम भाषा / गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी तर इयत्ता आठवीकरिता प्रथम भाषा/गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी असे पेपर घेण्यात आले. एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका होत्या.
पहिल्या पेपरची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजतापर्यंत तर दुसऱ्या पेपरची वेळ दुपारी १.३० ते ३ पर्यंत होती.
सदर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, राजन घरडे, शिक्षण विस्तार अधिकारी निलकंठ सिरसाटे, राजकुमार रामटेके, शिक्षक यु.जी. हरिणखेडे, प्रमोद बघेले व इतरांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)