११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट
By Admin | Updated: April 25, 2017 00:43 IST2017-04-25T00:43:18+5:302017-04-25T00:43:18+5:30
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट
‘जीडीसीसी’ने केली सुरूवात : गेल्या वर्षीच्या तुलनेत खरिपाचे कर्जवाटप घटणार
गोंदिया : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरिपासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. कर्जवाटपात दरवर्षीच जिल्हा बँक अग्रेसर राहाते. मात्र गेल्या आर्थिक वर्षात कर्जवसुलीचे प्रमाण घटले. त्यामुळे यंदा कर्जवाटपाचे टार्गेट वाढवून घेण्याऐवजी अंशत: कमी करण्यात आले आहे.
१ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. धानाचे कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ख्याती असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाचा बेभरोसा हे यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते. आर्थिक सक्षमता नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच कायम असते. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच नाही तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. असे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेची शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता यामुळे जिल्हा बँक अनेक वेळा ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते.
जिल्हा बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५ कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. १ एप्रिलपासून बँकेने कर्जवाटपाला सुरूवात केली असून आतापर्यंत १७ लाख रूपयांचे कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू होताच कर्जवाटपाच्या कामाला वेग येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
कर्जवसुलीअभावी टार्गेट कमी
मागील वर्षी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १२६.५० कोटींचे कर्जवाटपाचे टार्गेट होते. त्यात ११२.८८ कोटी कर्जवाटप करण्यात आले. मात्र ७१.४९ कोटींचीच कर्जवसुली झाली होती. कर्जवसुलीचे प्रमाण कमी असल्याने बँक ेने यंदा कर्जवाटपाचा जास्त बोझा घेऊन त्यात बाधा येवू नये याकरिता टार्गेट कमी करवून घेतले. यामुळे यंदा बँकेला ११५ कोटी कर्जवाटपाचे टार्गेट देण्यात आले आहे. यंदा घेतलेल्या टार्गेटनुसार बँकेने त्यासाठी व्यवस्था करून घेतली असून कर्जवाटपात अडचण येवू नये यासाठी टार्गेट कमी केल्याचे सांगण्यात आले.
२६ कोटी बँकेकडेच पडून
नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जमा झालेले २६ कोटी रूपये अजूनही बँकेकडेच पडून आहेत. एवढी मोठी रक्कम पडून असल्याने साहजिकच आर्थिक परिणाम जाणवतो. मात्र कर्जवाटपावर याचा परिणाम पडू नये यासाठी जिल्हा बँकेने मार्ग काढला आहे. जिल्हा बँक नाबार्डकडून १०० कोटी कर्ज घेणार आहे. यातून बँक मागील कर्जाचे ४० कोटी फेडणार व त्यातून ६० कोटी रूपये शिल्लक राहतील. शिवाय बँकेने केलेल्या कर्जवसुलीतून उर्वरित कर्जवाटपाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळेच २६ कोटींची रक्कम पडून असतानाही बँकेला कर्जवाटपात अडचण फारसी अडचण येणार नसल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.