११ हजार बालकांनी घेतला शाळाप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:17 IST2017-03-29T01:17:31+5:302017-03-29T01:17:31+5:30

‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये करण्यात आली.

11 thousand children took school | ११ हजार बालकांनी घेतला शाळाप्रवेश

११ हजार बालकांनी घेतला शाळाप्रवेश

अभियानाची फलश्रृती : जिल्हा परिषदेच्या शाळांत ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’
गोंदिया : ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये करण्यात आली. पुढच्या सत्रात १३ हजार ६११ बालकांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट ठरले होते. त्यापैकी १० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सुसज्य शाळांमध्ये मंगलमय शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्रत्येक मुल शिकावे व टिकावे यासाठी शिक्षण विभागातील यंत्रणेमार्फत या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते. सन २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासन निर्णयानुसार २६ जून २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या पटनोंदणी पंधरवाड्याची वाट न पाहता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालक-शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्या मदतीने बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. मागील वर्षी या उपक्रमा दरम्यान एकाच दिवशी १० हजार बालकांना प्रवेश देण्यात आला होता. यंदा १० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले होते.
यंदा आमगाव तालुक्यातील ११६ शाळांमध्ये १४५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ९१३ बालकांना, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३८ शाळांमध्ये १७३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ११०२ बालकांना, देवरी तालुक्यातील १४४ शाळांमध्ये १८८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १५०४ बालकांना, गोंदिया तालुक्यातील १८८ शाळांमध्ये ३०८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना २७८२ बालकांना, गोरेगाव तालुक्यातील १०९ शाळांमध्ये १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १३८९ बालकांना, सडक-अर्जुनी तालुक्यातील ११५ शाळांमध्ये १५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट असताना १२०८ बालकांना, सालेकसा तालुक्यातील १२० शाळांमध्ये ९४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना ८१३ बालकांना, तिरोडा तालुक्यातील १३९ शाळांमध्ये १४१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दीष्ट असताना १२११ बालकांना प्रवेश देण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६९ शाळांमध्ये १३ हजार ६११ बालकांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट होते यात १० हजार ९२२ बालकांचे नाव दाखल करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: 11 thousand children took school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.