१५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

By Admin | Updated: April 30, 2017 00:49 IST2017-04-30T00:49:50+5:302017-04-30T00:49:50+5:30

जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे.

1085 contaminated samples of water detected in 15 months | १५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

१५ महिन्यांत आढळले पाण्याचे १०८५ दूषित नमुने

५०१८ नमुन्यांची तपासणी : ग्रामीण भागातील स्रोत सर्वाधिक दूषित
गोंदिया : जिल्हा प्रयोगशाळेत गेल्या १५ महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले आहे. या दुषित नमुन्यांसाठी ग्रामपंचायत व नगर परिषद प्रशासन जबाबदार ठरत आहे.
जिल्हा प्रयोगशाळेत सन २०१६ मध्ये ग्रामीण भागातील १७७८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५०५ नमुने दुषित असल्याचे लक्षात आले. तर शहरी भागातील १७५४ नमुने तपासण्यात आले असून यातील २०० नमुने दुषित असल्याचे आढळले. सन २०१७ च्या जानेवारी महिन्यात ग्रामीण भागातील १६८ नमुने तपासले असून त्यातील ४८ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील१७५ नमुने तपासले असून १२ नमुने दुषित असल्याचे आढळले. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील २८९ नमुने तपासले असून त्यातील ९४ नमुने दुषित असल्याचे आढळले. शहरी भागातील १९३ नमुने तपासले असून ३५ नमुने दुषित असल्याचे आढळले. मार्च महिन्यात ग्रामीण भागातील ५३३ नमुने तपासले असता १७६ नमुने दुषित असल्याचे समोर आले. तर शहरी भागातील ११८ नमुने तपासले असून १५ नमुने दुषित असल्याचे आढळले.
जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या १५ महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार १८ नमुने तपासले असून १०८५ नमुने दुषित असल्याचे आढळले. त्यात ग्रामीण भागातील २ हजार ७७८ नमुने तपासले असून यातील २२३ नमुने दुषित आढळले.
शहरी भागातील २२४० नमुने तपासले असून २६२ नमुने दुषित असल्याचे आढळून आले. (तालुका प्रतिनिधी)

ग्रामपंचायतींची उदासीनता
ग्रामीण भागातील सर्वात जास्त पाण्याचे स्त्रोत दुषित आहेत. याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे. गावकऱ्यांकडून घर कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी अशा विविध माध्यमातून कराची वसुली ग्रामपंचायत करीत असते. परंतु ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे पाण्याचे स्त्रोत दुषितच असतात. गावातील सार्वजनिक किंवा खासगी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. कमी प्रमाणात ब्लिचिंग पावडर खरेदी करून त्यातही पैसे कमविण्याचा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे पाण्याचे दुषित स्त्रोत असतात.
दूषित पाण्यामुळे सर्वाधिक आजार
ग्रामीण भागात सार्वजनिक जलस्त्रोतातून पाण्याचा वापर केला जातो. परंतु ग्रामपंचायतींनी वेळोवेळी या जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे या पाण्यामुळे ग्रामीणांना विविध आजार जडतात. साथी सारखे आजारही पाण्यामुळेच पसरतात. या दुषित पाण्याचा सर्वात मोठा धोका पावसाळ्याच्या दिवसात होत असतो. याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

Web Title: 1085 contaminated samples of water detected in 15 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.