विदर्भ राज्यासाठी १०५० किमीची पदयात्रा
By Admin | Updated: August 20, 2014 23:36 IST2014-08-20T23:36:51+5:302014-08-20T23:36:51+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे.

विदर्भ राज्यासाठी १०५० किमीची पदयात्रा
दिल्लीत धडक देणार : सप्टेंबरला होणार सुरूवात
गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे.
विदर्भ प्रांतावर गेल्या ५४ वर्षांपासून अन्यायाची परंपरा सुरू आहे. त्यामुळे अॅक्शन कमिटीचे ५४ कार्यकर्ते ५ राज्यांमधून पायी प्रवास करणार आहेत. शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला सुरू होणारी ही पदयात्रा महात्मा गांधीच्या जयंतीला २ आॅक्टोबरला दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटीचे सरचिटणीस अहमद कादर यांनी दिली.
दरररोज ४० ते ४५ किलोमीटर पायदळ प्रवास करून हे कार्यकर्ते महाराष्ट्रात ८० किमी, मध्यप्रदेशात ५५० किमी, उत्तर प्रदेशात २५० किमी, राजस्थानमध्ये ६० किमी, हरियाणात ८० किमी व दिल्लीत ४० किमी याप्रमाणे एकूण १०५० किमी प्रवास ३० दिवसात पूर्ण करणार आहेत. विदर्भातील नागरिकांनी आपल्या परीने या पदयात्रेत सहभागी व्हावे तसेच विदर्भातील विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायतींनी आपआपल्या संस्थेत ठराव पारित करून संघटनेकडे द्यावे.
हे ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवून गोवा राज्याप्रमाणे स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे यावेळी विदर्भ नाग समितीचे निमंत्रक प्र्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी यावेळी सांगितले.
पत्रपरिषदेला दिनदयाल नौकरिया, नाग विदर्भ समितीचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, उपाध्यक्ष बलदेव सोनवआने, सचिव सुरेश लालवानी, जिल्हा प्रवक्ता हमीद सिद्दीकी, दीपक डोहरे, संतोष पटले, भुपेंद्र पटेल, मानकर गुरूजी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन हळूहळू पेट घेत आहे. त्यामुळे या बाजुने जनमत तयार होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)