रोजगार हमी योजनेची १०० टक्के कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:12 IST2018-02-27T00:12:07+5:302018-02-27T00:12:07+5:30

शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे.

100% of the employment guarantee scheme started | रोजगार हमी योजनेची १०० टक्के कामे सुरु

रोजगार हमी योजनेची १०० टक्के कामे सुरु

ठळक मुद्देनवेगाव (खु) मध्ये १५० रुपये रोजी : मजुरीसाठी लागतो १०० रुपये हप्ता

आॅनलाईन लोकमत
तिरोडा : शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे. परंतु त्यात अनेक गावातील मजुरांना १५० ते १६० मजूरी दररोजची मिळविण्यासाठी १०० रुपये हप्ता सदर कामावर नियुक्त रोजगार सेवक किंवा एखाद्या विश्वासपात्र हस्तकाद्वारे ही रक्कम कनिष्ठ अभियंता वसूल करतो अशी ओरड तालुक्यात मागील वर्षापासून सुरु आहे.
तालुक्यातील नवेगाव (खु.) येथील माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर सदर बाब सत्य असल्याची माहिती मिळाली. नवेगाव (खु.) मध्ये तुमसर रोडच्या जवळच्या मोहबागेतून एलोरा रेल्वेगेटच्या पांदणरस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर २८९ मजूर असून त्यांना मिळत असलेल्या रोजीनुसार काम प्रत्यक्षात होत नाही. परंतु चिरिमिरी देऊन १०० रुपये हप्त्याप्रमाणे मजुरांची रोजी १४० ते १५० रुपये रोज काढली जाते आहे असल्याची माहिती आहे.
शासनाने ठरवून दिलेले सरासरी शासन दर २०१ रुपये प्रति दिवस आहे. परंतु ही निश्चित रोजी वृक्षलागवड, कंपाऊंड, नाल्यावरील काम, झाडे कापने अशा बाबींसाठी आहे. माती खोदकामात नियमित दर लागू नाही. आजच्या यंत्रयुगात व भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे मनुष्याची काम करण्याची क्षमता फारच कमी झालेली आहे. परंतु शासनाचे निकष जुनेच आहेत. त्यामुळे मजूरवर्ग स्वत:ची रोजी वाढविण्यासाठी १०० रुपये हप्ता देत असल्याची माहिती आहे.
कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे त्यांनाही हप्ता बाबीचे फारशे गांभीर्य नाही. कारणही तसेच आहे. १५००० ते २०,००० रुपये पगारावर काम करते असल्याने एका अभियंत्याला आजच्या युगात तरी परवडण्यासारखे नाही. ही बाब सुद्धा शासनाने दखल घेण्यासारखी आहे. यात दोषी कोणाला ठरवावे हा सुद्धा प्रश्नच आहे. मजूर वर्गाला चिरिमिरी देता का असे विचारले असता कोणीही पुढे येऊन सांगायला तयार नाही. मोजमापानुसार रोजी काढली असता ३० ते ३४ रुपये रोजी मिळेल. यात आमचेच नुकसान होणार, त्यामुळे दबक्या आवाजात पैसे दिल्याचे मजूर सांगतात. हा प्रकार संपूर्ण तालुक्यातच सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

अनेक लोकप्रतिनिधी व लोकांचे मला फोन आले त्यात मजुरांकडून हप्ता वसूली होत आहे. अशी तक्रार मिळाली. त्यानंतर मी स्वत: कामावर जावून मोजमाप केली असता प्रत्यक्षात मजुरांचे त्यांना मिळत असलेल्या रोजीप्रमाणे काम होत नाही. परंतु मजुरांना योग्य रोजी मिळत असल्याने व कोणीही तक्रार केली नसल्याने कार्यवाही करता येत नाही.
एल.डी. चव्हाण
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एपीओ
गावात सुरु असलेल्या एमआरईजीएस च्या कामात मजूर पैसे देतात किंवा नाही याबाबद नक्की माहिती नाही. परंतु चर्चा आहे.
मिनल अनिल पटले
सरपंच नवेगाव खुर्द.

Web Title: 100% of the employment guarantee scheme started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.