खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना १० वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: October 21, 2015 01:56 IST2015-10-21T01:56:25+5:302015-10-21T01:56:25+5:30
जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना १० वर्षांची शिक्षा
टेमनी येथील प्रकरण : जिल्हा न्यायालयाची सुनावणी
गोंदिया : जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेमणी येथील बळीराम भुराजी किरणापुरे (५५) यांनी घटनेच्या सहा वर्षापूर्वी १२ डीसमील जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची रजीस्ट्री करण्यासाठी ते आरोपींना वेळोवेळी म्हणत होते. परंतु आरोपी रजिस्ट्री करून न देता त्यांना धमकी देत असत. यातून अनेक वेळा त्यांची शाब्दिक चकमक उडायची. सन २०१० मध्ये दुष्काळाचे २० हजार रूपये शासनाकडून आरोपींना मिळाले. त्याच्यातून बळीरामने आपला हिस्सा मागीतला होता. त्यावेळीही त्यांच्यात वाद झाला होता. श्रावण मारूती किरणापुरे (३५) याचे लग्न झाल्यावरही चार वर्ष मूलबाळ न झाल्यामुळे श्रावण बळीरामला जादूटोणा करीत असल्याचा संशय घेत वाद करायचा. १२ जुलै २०१० च्या रात्री बळीराम आपला नातू नंदकिशोर सोबत झोपले असता रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपी प्रेमलाल मारूती किरणापुरे (३२) व श्रावण मारूती किरणापुरे (३५) या दोघांनी कुऱ्हाडीने बळीरामवर घाव घालून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना घडताच नंदकिशोर ओरडत मामा रेखलाल धावत आला. त्याने या आरोपींनी घटनास्थळावरून पळताना पाहीले.
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांत भादंविच्या कलम ४५८,३०७, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर निकाल देताना जिल्हा न्यायाधीश १ एस.आर. त्रिवेदी यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी.बी. कुंदोजवार यांनी केला. या प्रकरणात सरकारी वकील कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी दोन्ही भावंडांना कलम ४५८ अन्वये सात वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. कलम ३०७ अन्वये १० वर्षाची शिक्षा एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएससलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)