१० हजार मजुरांना लाभला गुळाचा गोडवा
By Admin | Updated: January 24, 2015 22:57 IST2015-01-24T22:57:20+5:302015-01-24T22:57:20+5:30
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव सडक-अर्र्जुनी तालुक्यात मध्यम प्रतीचे २५ गुळ कारखाने तर घरगुती, पारंपारीक पद्धतीचे ७८ कारखाने आहेत. यामध्ये ऊसापासून रस काढून गूळ तयार केले जाते.

१० हजार मजुरांना लाभला गुळाचा गोडवा
तुकाराम झोडे - कोसमतोंडी
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव सडक-अर्र्जुनी तालुक्यात मध्यम प्रतीचे २५ गुळ कारखाने तर घरगुती, पारंपारीक पद्धतीचे ७८ कारखाने आहेत. यामध्ये ऊसापासून रस काढून गूळ तयार केले जाते. ऊस तोडणी पासून गूळ निर्मिती करेपर्यंत एका मध्यम प्रतीच्या गुळ निर्मिती कारखान्यावर एका दिवसाला १०० मजूराची गरज भासते. म्हणजेच एक कारखाना १०० मजुरांना रोजगार देतो. सडक-अर्जुनी तालुक्यात १०३ कारखाने असल्यामुळे १० हजार ३०० लोकांना हा व्यवसाय डीसेंबर ते एप्रिल असा पाच महिने रोजगार देतो.
ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे दोन-तीन वर्षापुर्वी रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील मजूर शहरांकडे मोठ्या प्रमाणात पलायन करीत होते. परंतु दोन-तीन वर्षापासून ग्रामीण भागात ऊसापासून गूळ निर्मिती करणारे लहान-मोठे कारखान्यांचे जाळे तयार झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांच्या हाताला काम मिळत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असून शेतकरी ऊस लागवड शेतीकडे वळत आहे.
गोंदिया-भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु निसर्गाचा प्रकोप व विविध समस्यामुळे धान उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादक खर्च भागविने कठीण झाले आहे. त्यामुळे परंपरागत धान उत्पादन शेतीचा मोह टाळून तो आता ऊस उत्पादनाकडे वळत आहे. जिल्ह्यात गूळ निर्मिती करणाऱ्या कारखान्याची संख्या वाढत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. मधल्या काळात ऊसावर आधारीत ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे नव्हते. त्यामुळे धान उत्पादक काळात ऊसावर आधारीत ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे नव्हते. त्यामुळे धान उपादक शेतकरी पारंपारीक पद्धतीने फक्त धानाचीच शेती करायचा. परंतु ग्रामीण भागात छोटे-छोटे कारखाने उघडल्यामुळे ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.