१० लाख क्विंटलने सोयाबीनची आवक घटली
By Admin | Updated: December 4, 2014 23:12 IST2014-12-04T23:12:54+5:302014-12-04T23:12:54+5:30
जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे

१० लाख क्विंटलने सोयाबीनची आवक घटली
दुष्काळाच्या झळा : सोयाबीनच्या उत्पन्नात यंदा विक्रमी तूट; शेतकरी हवालदिल
वर्धा : जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तब्बल १० लाख क्विंटल सोयाबीनची आवक कमी झाली आहे. झालेली आवक या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्याच्या आसपासच आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ ४ लाख १३ हजार २८७ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे.
पावसाच्या दडीने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा करण्यापासून ते काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. पहिली पेरणी झाली तिही पावसाच्या दडीमुळे मोडकळीस निघाली. दुबार पेरणी झाली तिची अवस्थाही तशीच झाली. तिबार पेरणी केली. पेरणी करून पिकाची वाढ होत नाही तोच ते सवंगण्याची वेळ आली. केवळ तीन महिन्याच्या कालावधीचे असलेले हे पीक कापणीची वेळ येताच वाळूू लागले. यामुळे सोयाबीनची उतारी येणारच नसल्याचा साऱ्यांचा अंदाज होता. शेतकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरला.
शेतकऱ्यांनी वेळ आल्यावर सोयाबीनची सवंगणी करून कापणी केली. यात कोणला एका एकरात क्विंटलभर तर कुणाला अर्धा क्विंटलच्यावर सोयाबीन झाले नाही. मळणीत हाती आलेला सोयाबीनचा आकारही ज्वारीच्या दाण्यासारखा दिसला. हा दाणा पाहून भावही मिळण्याची आशा मावळली.
शेतकऱ्यांनी मळणी करून काढलेले सोयाबीन बाजारात आणले खरे पण ते इतर वर्षांच्या तुलनेत कमीच राहिल्याचे जिल्ह्यात असलेल्या सातही बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या काळापर्यंत बाजार समितीत झोलेली सोयाबीनची आवक इतर वर्षांच्या तुलनेत कमी असल्याची दिसून आली आहे. ही घट हजारांची नाही तर लाखांच्या घरात आहे. सोयाबीन विकून रबी हंगाम साजरा करण्याची शेतकऱ्यांची असलेली आशा या घटीमुळे धुळीस मिळत असल्याचे वास्तव आहे. (प्रतिनिधी)