जि.पं. निवडणूक पक्ष पातळीवर नकोच
By Admin | Updated: February 11, 2015 02:10 IST2015-02-11T02:10:37+5:302015-02-11T02:10:40+5:30
मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर लढविण्यासंदर्भात राज्य सरकारने जो वटहुकूम जारी केला आहे

जि.पं. निवडणूक पक्ष पातळीवर नकोच
मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर लढविण्यासंदर्भात राज्य सरकारने जो वटहुकूम जारी केला आहे. त्या विरोधात राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी ‘गोवाज मुव्हमेंट अगेन्स्ट पंचायत आॅर्डिनन्स’ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
मंगळवारी मडगावात या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. या वटहुकूमाविरोधात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन पुढील कृती ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला गोवन्स फॉर गोवाचे कॅनेडी आफोन्सो, गोवा सुराज्य पार्टीचे फ्लोरियान लोबो, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष जयेश साळगावकर, पंचायत फोरमचे निमंत्रक जोसेफ वाझ, काँग्रेसचे दुर्गादास कामत, राष्ट्रवादीच्या राखी नाईक, अॅड. आयरिश रॉड्रिगीस तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अॅड. रॉड्रिगीस म्हणाले की, गोव्यातील भाजपा सरकारला स्थानिक स्वराज संस्था लोकशाही पध्दतीने चाललेल्या नको आहेत. यासाठीच त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षपातळीवर घेण्याचे ठरविले आहे. सरकारला जर असाच निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी हा विषय विधानसभेत आणून त्यावर चर्चा करण्याची गरज होती. मात्र, अशी कुठलीही चर्चा न करता वटहुकूमाद्वारे मागच्या दाराने हा निर्णय लादला गेला आहे, असे ते म्हणाले. लोकांवर निर्णय लादले गेले तर त्याचा परिणाम काय होतो, हे दिल्ली निवडणुकीने दाखवून दिले आहे. गोव्यातही मनमानी करणाऱ्या भाजपा सरकारला त्यांच्या निर्णयाचे परिणाम लवकरच कळून येतील, असे ते म्हणाले.
गोवन्स फॉर गोवाचे निमंत्रक कॅनेडी आफोन्सो यांनी भाजपा सरकारचा हा निर्णय लोकशाहीविरोधी असून, या निर्णयाला रस्त्यावर उतरून आम्ही विरोध करू, असे सांगितले. दुर्गादास कामत यांनी भाजप सरकारला राज्यकारभार लोकशाही पध्दतीने चालवायचा नाही हेच सिध्द होते, असा आरोप केला. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष जयेश साळगावकर यांनीही भाजपाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार असल्याचे सांगितले.
(प्रतिनिधी)