गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचा युवकांना विसर
By Admin | Updated: December 29, 2014 01:48 IST2014-12-29T01:46:39+5:302014-12-29T01:48:36+5:30
राजेंद्र आर्लेकर : साखळी येथे रवींद्र महोत्सवाचा समारोप

गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचा युवकांना विसर
डिचोली : गोव्याची परंपरा व संस्कृती महान आहे. शेकडो वर्षांपासून पिढ्यान््पिढ्या ती जपण्याचे कार्य आजपर्यंत झालेले आहे. लोकोत्सव, सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून सातत्याने नव्या पिढीला हा समृद्ध वारसा पुनर्जीवित करण्याचे भाग्य लाभत असते. दुर्दैवाने या जुन्या परंपरांचे, कलांचे महत्त्व नव्या पिढीला समजत नाही. त्यामुळे रवींद्र महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक संचित व वारसा जपण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
साखळी येथे रवींद्र भवनात दोन दिवशीय रवींद्र महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उपसभापती अनंत शेट, आमदार डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे विश्वजित कृ. राणे, रवींद्र काणेकर, उमेश सरनाईक, उपेंद्र कर्पे आदी उपस्थित होते.
आर्लेकर म्हणाले की, नवी पिढी आधुनिक संस्कृतीकडे वळत असल्याने व त्यांना पालकांचेही प्रोत्साहन लाभत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. एकीकडे विशिष्ट संगीत महोत्सवातून विकृतीचा खेळ सुरू असताना संस्कृतीच्या रक्षणासाठी रवींद्र महोत्सवाचे आयोजन करून त्या विकृतीवर मात केली जात आहे. संस्कृती व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महान कार्य या महोत्सवातून होत असल्याची समाधानाची बाब आहे. युवा पिढीने हा वारसा टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे सांगून आर्लेकर यांनी संस्कृती व विकृतीतील फरक ओळखण्याचे आवाहन केले.
या वेळी विविध पथकांनी लोककलेचा आविष्कार सादर केला. फुगडी, धालो, रणमाले, मोदलो आदी नृत्यांचे सादरीकरण झाले.
दोन दिवसांत झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. रेणुका देसाई, हनुमंत परब यांनी महोत्सवाचा आढावा घेतला.
या वेळी शंभरी उलटलेल्या तारामती गावकर यांचा सभापती आर्लेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आमदार सावंत यांनी स्वागत केले. प्रमोद महाडेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पुरातन वस्तूंचे प्रदर्शन, चित्रकला, पाककला व लघु उद्योगाच्या स्टॉलवर गर्दी होती.
(प्रतिनिधी)