मोफत वायफायची युवा वर्ग घेतोय मजा; आतापर्यंत ५२,५८२ युजर्स, सरकारला २ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 08:46 IST2025-08-04T08:46:44+5:302025-08-04T08:46:44+5:30
वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ठराविक ठिकाणांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

मोफत वायफायची युवा वर्ग घेतोय मजा; आतापर्यंत ५२,५८२ युजर्स, सरकारला २ कोटींचा खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात ठिकठिकाणी सरकारने उपलब्ध केलेल्या मोफत वाय-फायचा खास करुन युवा वर्ग फायदा घेत आहेत. आतापर्यंत ५२,५८२ युजर्सनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारने आजपावेतो यावर २ कोटी ८३ लाख ४७हजार १४० रुपये खर्च केले.
वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ठराविक ठिकाणांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणांवर आल्यानंतर वायफाय हॉटस्पॉट कनेक्ट करायचा, आपले युजर नाव टाकायचे व पासवर्ड म्हणून स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा आणि रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अकाउंट तयार होतो. त्यानंतर ओटीपी येईल. हा ओटीपी व मोबाइल नंबर फीड करायचा व अॅक्टिवेट केले की वायफाय वापरता येते अशी पद्धती आहे.
मेसर्स डिजिटल नेटलर्क असोसिएटस प्रा. लि, मेसर्स जीटीपीएल ब्रॉडबँड प्रा. लि, मेसर्स ग्लोबस इन्फॉर्मेटिक्स प्रा. लि, मेसर्स दिनेश इंजिनीयरिंग प्रा. लि. या कंपन्यांनी वायफाय हॉटस्पॉटचे काम केले आहे. सरकारने यावर २ कोटी ८३ लाख ४७ हजार १४० रुपये खर्च केले.
अधिकृत माहितीप्रमाणे मेसर्स डिजिटल नेटलर्क असोसिएटस प्रा. लि कंपनीला १ कोटी ९ हजार ३५० रुपये, मेसर्स ग्लोबस इन्फॉर्मेटिक्स प्रा. लि कंपनीला ४१ लाख ८६ हजार ६४० रुपये तर मेसर्स दिनेश इंजिनीयरिंग प्रा. लि. कंपनीला १ कोटी ४१ लाख १५० रुपये वाय फाय स्थापित करण्यासाठी देण्यात आले.
पेडणेपासून काणकोणपर्यंत युवावर्ग मोफत वायफायचा लाभघेत आहे. पेडणे तालुक्यात हरमल तिठा, मांद्रे पंचायत, तुयें पंचायत, नागझर स. प्रा. शाळा व इतर ठिकाणी, काणकोण तालुक्यात खोतीगाव, पैंगीण, श्रीस्थळ स. प्रा. शाळा आदी भागात तसेच धारबांदोडा तालुक्यात किर्लपाल दाभाळ, कावरें स. प्रा. शाळा परिसरात दुर्गम ठिकाणीही मोफत वायफायचा लाभ युवा वर्ग घेत आहे.