विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:41 IST2025-01-30T13:40:22+5:302025-01-30T13:41:30+5:30
नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ सत्यात आणण्यासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. युवकांनी स्वतःचा विकास केला तरच देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे युवकांनी स्वतःचा विकास करून देशाचा विकास करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, अरविंद खुटकर, नितीन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी २०४७ विकसित भारत होण्यासाठी विविध मार्गे युवकांना जोडले आहे. अनेक युवक पंतप्रधानांच्या माय भारत पोर्टल अॅपवर जोडले जात आहेत. युवक हे देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे ते क्लीन इंडिया, फीट इंडिया सारखी मोहीम राबवित आहेत. त्यामुळे आज देशाचा युवक सर्वच बाजूंनी विकसित होत आहे. त्यांना सरकारचे बळ मिळत आहे.
इतर राज्याच्या तुलनेत गोवा हे एकमेव राज्य आहे ज्याने पंतप्रधांनांनी सुरू केलेल्या विविध योजना १०० टक्के पूर्ण केल्या आहेत. राज्यात हर घर जल १०० टक्के झाले आहे. हर घर शौचालय १०० टक्के पूर्ण झाले आहे. हर घर वीज अशा विविध क्षेत्रात गोवा अग्रेसर आहे. कारण गोव्यात आम्ही या योजना तळागळातील लोकापर्यंत राबवित असतो.
स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री
आताच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आचार आत्मसात केले पाहिजेत. त्याच्या विचारांची प्रेरणा घेत स्वतःचा विकास केला पाहिजे. तरच देशाचा विकास होणार आहे.