तुम्ही कामे करा, पैसे आम्ही देतो: केंद्रीय मंत्री जोअल ओरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:54 IST2025-07-04T12:53:19+5:302025-07-04T12:54:06+5:30
सांगे येथील कार्यक्रमात धरती आबा जनभागीदारी अभियानाचे उद्घाटन

तुम्ही कामे करा, पैसे आम्ही देतो: केंद्रीय मंत्री जोअल ओरम
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'धरती आबा जनभागीदारी योजनेसाठी ७९ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. तुम्ही फक्त कामे करा, पैसे द्यायची जबाबदारी आमची आहे', असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जोअल ओरम यांनी केले. ३० दिवसीय धरती आबा जनभागीदारी अभियानाबाबत सांगे नगरपालिका सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सभापती रमेश तवडकर, खासदार सदानंद तानावडे, आमदार गणेश गावकर, नगराध्यक्षा संतिक्षा गडकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्री ओरम म्हणाले की, 'योजनेतून घरे बांदणे, गावोगावी रस्ते बनविणे, पाणी, वीज या सुविधा ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम होईल.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'आदिवासी समाजाशी माझे रक्ताचे नाते नाही. रक्ताचे नाते असलेले आले आणि गेले. पण माझे त्यांच्याबरोबर भावनिक नाते आहे. भाजप सरकारने या समाजाला मान दिला. माझ्या आदिवासी आयोग, महामंडळ, रिसर्च सेंटरची घोषणा झाली. कुणबी व्हिलेजही लवकरच होईल.'
सभापती तवडकर म्हणाले की, अंत्योदय तत्वावरील आमचे सरकार सर्वसामान्य माणसाचा विकास करण्यासाठीच आहे. समाजाला आदिवासी दर्जा देण्याचे काम भाजप आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरु केले होते. ते पुढे नेण्याचे काम भाजपाने केले.
खासदार सदानंद तानावडे म्हणाले, 'सरकारची योजना योग्य माणसापर्यंत पोहचली पाहिजे म्हणून हे ३० दिवसीय अभियान आहे. याची सुरुवात सांगेपासून होत आहे.
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की सांगे मतदार मतदारसंघाचे विकासकामे करताना मुख्यमंत्री सावंत यांचे सहकार्य मोलाचे आहे. गोविंद भगत यांनी सूत्रसंचलन केले. दीपक देसाई यांनी आभार मानले. यावेळी दोन स्कूलबसचे लोकार्पण झाले. हेल्थ कॅम्पचेही उद्घाटन झाले.
ही शरमेची बाब
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'माझ्या आधीच्या काळात हजारो फॉर्म पडून राहिले होते. ते मी पूर्ण केले. असे असताना काही लोक आरोप करतात ही शरमेची बाब आहे. सरकारच्या सुविधा कुणीही सोडू नका.. २०४७ पर्यंत एकसुद्धा माणून मागे राहणार नाही. आपण सगळे विकसित गोव्याचे साक्षिदार होणार आहोत.
कोणीतरी येतो आणि...
सभापती रमेश तवडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'भाजपाने तयार केलेल्या पीचवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बॅटिंग करायला हवी होती. पण, मध्येच भाजपाशी काहीही सबंध नसलेला कोणीतरी येतो आणि आणि बॅटिंग करून निघून जातो. आम्ही मैदान मारायला पाहिजे.