होय, मी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत; परुळेकरांसह मांद्रेकरांचाही दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:04 IST2025-01-03T08:03:37+5:302025-01-03T08:04:23+5:30
दिल्लीला नावे पाठवल्याची माहिती

होय, मी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत; परुळेकरांसह मांद्रेकरांचाही दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण आहे व माझे नाव दिल्लीला पक्षाच्या हायकमांडकडेही पाठविलेले आहे, असे माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल स्पष्ट केले, तर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्यापेक्षा दुसरा कोणी योग्य असू शकत नाही, असे सांगून पदावर दावा केला आहे.
म्हापशात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. परुळेकर म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदासाठी मी निश्चितच शर्यतीत आहे. तानावडे यांनी माझा बायोडेटाही मागून घेतलेला आहे. चार ते पाच नावे दिल्लीला पाठविली असल्याचे त्यांनी मला सांगितले असून यात माझेही नाव आहे.
फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने साळगावमध्ये मला तिकीट नाकारले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष संघटनेत मला मोठे पद देणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते आता पूर्ण केले जाईल, अशी मला खात्री असल्याचेही परुळेकर म्हणाले. दरम्यान, भापजच्या संघटनात्मक निवडणुका सध्या चालू आहेत. येत्या १० तारखेपर्यंत मंडल अध्यक्ष निवडले जातील. त्यानंतर जिल्हाध्यक्ष तसेच महिनाअखेरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल.
पत्नीला राजकारणात आणणार नाही : जोशुआ
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना पत्नीला राजकारणात आणणार नाही, असे सांगितले. म्हापसा मंडल अध्यक्षपद जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्याला दिले जाईल. माझ्या पत्नीला राजकारणात येण्याची इच्छा नाही. एकाच कुटुंबात दोन पदे असू नयेत या विचाराचे आम्ही आहोत. वडील फ्रान्सिस डिसोझा हयात असताना व म्हापशाचे आमदार असताना त्यांना अनेकांनी मला अन्य एखाद्या मतदारसंघात रिंगणात उतरवावे, असा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी तो कधीच मान्य केला नाही.
आपणच योग्य : मांद्रेकर
मागील ३० वर्षांहून अधिक काळ पक्षाची आपण सेवा केली. पक्षात काम करताना ४ वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली. संघटना म्हणून उपाध्यक्ष पदापर्यंत काम केले आहे. पक्षाच्या कोअर कमिटीतही काम केले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्यापेक्षा दुसरा योग्य व्यक्ती असू शकत नाही, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते दयानंद मांद्रेकर यांनी केला आहे. श्रीपाद नाईक हे खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनाच उमेदवारी दिली जाणार हे ज्ञात असूनही खासदारपदासाठी आपणही दावा केला होता. दावा करण्यात काहीच गैर नाही. शेवटी उमेदवारी भाऊंनाच मिळाली. कदाचित त्यांच्या जागी आपण उमेदवार असतो तर त्यांच्यापेक्षा जास्त मते प्राप्त करू शकलो असतो, असाही दावा त्यांनी केला.
आपले पुनर्वसन होईल : परुळेकर
पक्षाकडून उमेदवारी नाकारताना आपल्याला पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची प्रतीक्षा आजही आपल्याला असून पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या रूपात आपल्याला योग्य न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली असून त्यात आपल्याही नावाचा समावेश असल्याचे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्षपदासाठी कोण शर्यतीत आहे हे पक्ष पाहत नाही. अनुभवानुसार निर्णय घेतला जातो. दावा कोणीही करावा, पण अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जातो. त्यासाठी लागणारी सर्व विस्तारित माहिती त्यांच्याजवळ असते. त्या माहितीनुसार निर्णय घेतला जातो. या होणाऱ्या निर्णयातून आपल्याला योग्य न्याय मिळेल असा विश्वास वाटतो, असे परुळेकर म्हणाले. प्रदेशाध्यक्षपदासाठी लागणारी आपली विस्तारित माहिती पक्षाकडून घेण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
सहाजणांची नावे : 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, परुळेकर, मांदेकर यांच्याबरोबरच अॅड. नरेंद्र सावईकर, दयानंद सोपटे, दामू नाईक व बाबू कवळेकर असे एकूण सहाजण शर्यतीत आहेत.