पावसाअभावी शेतकऱ्यांत चिंता
By Admin | Updated: June 26, 2014 01:25 IST2014-06-26T01:24:02+5:302014-06-26T01:25:32+5:30
हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांत चिंता
हणखणे : पावसाच्या भरवशावर नांगरलेल्या जमिनीला पाण्याची आस आहे तर तिळारी कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशात शेती करावी या चिंतेने हणखणे परिसरातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. पेरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील पाणी वाटप समित्यांनी अशा गंभीर वेळी तिळारी कालव्यातील पाणी कसे पुरविता येईल या बाबत तिळारी प्रकल्प अभियंत्यांना विचारणा करावयास हवी, अशी मागणी होत आहे.
पेडणे तालुक्यातील युवक शेतीकडे वळू लागल्याचे समाधानकारक चित्र असताना यंदाचा पावसाळ्याचा पहिला महिना तर कोरडाच गेल्याने चिंतेत भरच पडली आहे. पावसाळा वेळीच सुरू झाला असता तर आता तरवा वाढून आला असता. एव्हाना लावणी सुरू झाली असती; परंतु पावसाअभावी गणिते चुकत चालली आहेत. शिवाय तिळारीतूनही पाणी सोडले जात नसल्याने कालव्यांत ही ठणठणाट आहे. गावागावांत स्थापन केलेल्या पाणी वाटप समित्या कालव्यात पाणी का नाही याबाबत मौन बाळगून असल्याचा आरोप होत आहे. अधीक्षक अभियंता एम. के. प्रसाद, शेतकी खात्याचे अधिकारी प्रसाद परब यांनीही पावसाळा सुमारे एक महिना लांबणीवर पडल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.
पेरणी प्रक्रियेस उशीर होत गेल्यास ऐन भरात असताना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान
होण्याची भीती खुटवळ येथील शेतकरी अशोक सावंत यांनी व्यक्त केली आहे. तरव्यासाठी
घातलेला भातही खराब होण्याच्या मार्गावर आहे.
शेतात चिखल झाल्याशिवाय तरवा लावताच येत नाही. मात्र, त्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, गत काही वर्षांत वन्यजीवांच्या त्रासाने शेतकरी पुरता हैराण झालेला असताना चालू वर्षी पावसाळा लांबल्याने चिंतेत भरच पडत चालली आहे. भोळा बळीराजा मात्र पावसासाठी देवाला साकडे घालत आहे.
(प्रतिनिधी)