संदीप नाईक, पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : १३ फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. माध्यमांचे स्वरुप वेगाने बदलत आहे. अशा काळात रेडिओ आणि त्या संदर्भातील काही गोमंतकीयांनी जागविलेल्या आठवणी.
१९८० च्या दशकात एखाद्याकडे मोठ्या रेडिओ असणे म्हणजे अभिमानाची गोष्ट होती. तेव्हा खूप कमी लोकांकडे रेडिओ असायचा. रेडिओ असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण असे मानले जाई. रेडिओवरील 'विविधभारती' हे स्टेशन अनेकांच्या पसंतीचे असून, त्याच्यावरून प्रसारित होणारे कार्यक्रम, क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन ऐकण्यासाठी लोक ज्यांच्याकडे रेडिओ आहे त्यांच्याशी जवळीक करून रेडिओ ऐकण्याचा आस्वाद घ्यायचे.
१९९२ मध्ये राज्यात 'रंगीत टेलिव्हिजन' यायला सुरुवात झाल्यानंतर १९९४ पासून रेडिओची पसंती कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गोव्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात असलेली रेडिओ विक्रीची दुकाने हळूहळू बंद होण्यास सुरुवात झाली. त्याची जागा 'टीव्ही'ची दुकाने घ्यायला लागली, अशी माहिती रेडिओ, टेपरेकॉर्डर, टीव्ही, एलसीडी, एलईडी आदी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक संदीप सदाशिव नाईक यांनी दिली.
साकवाळ येथील ५९ वर्षीय संदीप नाईक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक म्हणून प्रसिद्ध आहेत. संदीप यांनी १९८७ ते १९८९ मध्ये मडगाव येथील आयटीआयमधून रेडिओ आदी उपकरणे दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. १३ फेब्रुवारीला 'जागतिक रेडिओ दिवस' साजरा केला जात असल्याने संदीप यांच्याशी रेडिओ बाबतच्या आठवणी जाणण्यासाठी चर्चा केली असता त्यांनी रेडिओशी संबंधित गत काळातील अनेक आठवणी सांगितल्या. १९८९ पासून संदीप यांनी रेडिओ दुरुस्त करण्यास सुरुवात केल्यानंतर बरीच वर्षे ते काम केले. त्यांनी तापी, ताकाय, फिलिप्स, नॅशनल अशा विविध कंपन्यांचे रेडिओ दुरुस्त केल्याची माहिती दिली.
१९८० च्या दशकात गोव्यात रेडिओ असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण असायचे असे लोक मानायचे. त्या काळात लोक रेडिओवरील 'विविधभारती' स्टेशन ऐकण्यास खूपच पसंत करायचे. रेडिओच्या या स्टेशनवरून सादर होणारे हवामहल, जयमाला, फर्माईश गीत, छायागीत, भूले बिसरे गीत, असे अनेक कार्यक्रम सादर व्हायचे. ज्यांची लोकांत खूप मोठी पसंती असायची. तेव्हा गोव्यातील विदेशात काम करणारे बांधव गोव्यात येताना रेडिओ आणायचे. ती त्यांच्याबरोबरच त्यांच्या जवळच्यांसाठी त्या काळात एक मोठी अभिमानाची गोष्ट असायची. रेडिओवरील गोव्याचे कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक प्रतीक्षा करायचे. त्या कार्यक्रमात गोंयशाहीर उल्हास बुयांव, लॉर्ना यांच्यासारख्या अनेक गोमंतकीय आणि कोंकणी गायक कलाकारांची गाणी प्रसारित होत असत.
प्रशिक्षण ठरले गरजेचे
तेव्हा रेडिओचा खपही जास्त असल्याने वास्को, मडगाव, पणजी, म्हापसा आदी राज्यातील मोठ्या शहरांत रेडिओ विकणारी दुकाने मोठ्या संख्येने होती. एकेकाळी आमच्याकडे लोक मोठ्या प्रमाणात रेडिओ दुरुस्तीसाठी यायचे. टीव्हीच्या आगमनानंतर हळूहळू रेडिओची पसंती कमी व्हायला लागली. माझ्यासारख्या अनेक रेडिओ दुरुस्त करणाऱ्या यांत्रिकांना टीव्ही दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागले., अशी माहिती त्यांनी दिली.
मेकॅनिक म्हणून कारकीर्द रेडिओ दुरुस्तीने सुरु केली. आजही एलईडी दुरुस्त करतो. वेळ बदलला तशी माध्यमे बदलली असून, काळानुसार मेकॅनिक म्हणून आम्हालाही बदलावे लागले असले तरी १९८० दशकातील रेडिओच्या त्या आठवणी काढताना नक्कीच अनेक जणांच्या मुखातून 'जाने कहा गये वो दिन... हे शब्द सुटतील असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
... तेव्हा अनेकांना आर्थिक लाभ
गोवा मुक्तीनंतर गोव्याच्या झुआरीनगर, बिर्ला आदी भागात मोठ्या प्रमाणात कर्नाटक येथील नागरिक कामाच्या निमित्ताने येऊन वास्तव्य करायला लागले. त्यांना कोंकणी समजत नसे. कन्नड भाषेतील रेडिओवरील कार्यक्रम ऐकता यावे यासाठी रेडिओ मेकॅनिकांनी त्यांच्या सोयीसाठी रेडिओमधील 'कॉईल डिझाईन' बदलून तो असा केला की, ज्यामुळे गोव्यात बसून कर्नाटकमधील रेडिओवर प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकायला येऊ लागले. तेव्हा आम्हाला काही दक्षिणेतील भाषा येत नव्हत्या.
Web Summary : Goa celebrates World Radio Day, reminiscing about radio's golden era. Radios symbolized status in the 80s. TV's arrival led to radio shop closures. Radio mechanic Sandeep Naik recalls repairing radios and the popularity of Vividh Bharati.
Web Summary : गोवा विश्व रेडियो दिवस मना रहा है, रेडियो के स्वर्णिम युग को याद करते हुए। 80 के दशक में रेडियो प्रतिष्ठा का प्रतीक था। टीवी के आने से रेडियो की दुकानें बंद हो गईं। रेडियो मैकेनिक संदीप नाइक को विविध भारती की लोकप्रियता और रेडियो की मरम्मत याद है।