म्हापशात रोलर कलंडून महिला ठार, युवक जखमी

By Admin | Updated: January 20, 2015 02:15 IST2015-01-20T02:10:05+5:302015-01-20T02:15:05+5:30

दहा दुचाकींचा चक्काचूर : चालकाचे प्रसंगावधान

Women killed in rolling mill in Mapusa, youth injured | म्हापशात रोलर कलंडून महिला ठार, युवक जखमी

म्हापशात रोलर कलंडून महिला ठार, युवक जखमी

बार्देस : म्हापसा पालिकेकडून बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रोड रोलरचा ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीला धडक बसून महिला ठार झाली, तर दुचाकीस्वार युवक जखमी झाला आहे. ललिता संतोष मडगावकर (वय ५०, रा. गवंडाळ, उसकई-बार्देस) असे मृत महिलेचे नाव असून तिचा मुलगा शुभम मडगावकर (वय १९) याच्यावर म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेफाम वेगाने जाणाऱ्या रोलरखाली अनेक दुचाक्या सापडल्या, तसेच दोन दुकानांना रोलने धडक दिली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने अनेकांनी आपापल्या गाड्या बाजूला
घेऊन सुरक्षित जागी पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास म्हापसा न्यायालयाकडून पालिकेच्या बाजूने बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रोड रोलरचे ब्रेक निकामी झाले व रोलरने वेग घेतला. ही बाब चालक बसू यल्लाप्पा खरेनवथ (वय २८, रा. गोकाक-कर्नाटक, सध्या रा. मडगाव) याच्या लक्षात येताच त्याने एका हाताने स्टेअरिंग धरले, तर दुसऱ्या हाताने लोकांना इशारे करून मोठ्याने आरडाओरडा केला. त्या वेळी पादचाऱ्यांनी धूम ठोकली, तर वाहनचालकांनी रस्त्याच्या एका कडेला वाहने उभी केली. मात्र, एका दुचाकीला रोलर आदळल्याने महिला ठार झाली व दुचाकी चालवणारा तिचा मुलगा जखमी झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकींना चिरडत रोलर पालिकेच्या उतरणीवर असलेल्या मिनेझिस औषधालयाच्या बाजूला मंगेश फोस्टो स्टुडिओजवळ कलंडला.
या अपघातात एकूण दहा दुचाकी चिरडल्या गेल्या, तर एका चारचाकीला धक्का लागून नुकसान झाले. काही दुकानदारांचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती म्हापसा शहरासह परिसरात कळताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. या वेळी म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक तुषार वेर्णेकर, इतर पोलीस उपस्थित होते. तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, जवान हनुमंत हळदणकर, अशोक मिशाळ, विष्णू गावस, नामदेव तारी, नारायण चोडणकर, नरेंद्र शेट्ये, जितेंद्र सिनारी, रामा नाईक, संतोष तानावडी, प्रदीप गावकर यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य केले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने रोड रोलर काढण्यात आला.
या अपघातामुळे सुमारे दीड तास वाहनांची कोंडी झाली होती. (पान २ वर)

Web Title: Women killed in rolling mill in Mapusa, youth injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.