दोन वर्षांत पाच हजार नोकऱ्या देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:54 IST2025-09-20T12:53:27+5:302025-09-20T12:54:16+5:30

'सेवा पंधरवडा'निमित्त रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

will provide 5 thousand jobs in two years said cm pramod sawant | दोन वर्षांत पाच हजार नोकऱ्या देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दोन वर्षांत पाच हजार नोकऱ्या देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे पुढील दोन वर्षांत आणखी पाच हजार नोकऱ्या देणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. विविध सरकारी खात्यांमध्ये ९७० पदांवर भरतीसाठी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते यावेळी नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

भाजपच्या 'सेवा पंधरवड्या' निमित्त कला अकादमीत रोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी सावंत म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांच्या ४७५ जागा भरलेल्या आहेत. राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे पुढील सहा महिन्यांत या जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जातील. युवकांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी ठेवायला हवी. मुख्यमंत्री म्हणाले की, मनुष्यबळ विकास महामंडळाची नोकरी कोणीही कमी समजू नये. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाप्रमाणेच त्या कर्मचाऱ्यांनाही लाभ दिले जातात, तसेच ज्यांचे शिक्षण कमी आहे त्यांना शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी शिक्षणासाठी महामंडळ शुल्काचा भार उचलते. महामंडळातर्फे भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्षे सेवा दिल्यास त्यांनाही सेवेत कायम केले जाते. 

मंत्री शिरोडकर म्हणाले की,' गोव्यातील पाच लाख कुटुंबे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कार्यक्रमास राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मनुष्यबळ विकास महामंडळाचे अध्यक्ष रुडॉल्फ फर्नाडिस, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार जीत आरोलकर, महापौर रोहित मोन्सेरात, आयएएस अधिकारी सरप्रीत सिंग गिल, संचालक दीपक बांदेकर उपस्थित होते.

उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी यूपीएससी, जीपीएससी, बँक, रेल्वेच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसावे म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षांना बसून राष्ट्रीय स्तरावर चमकलेले चमकताना दिसले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारने अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप सुरू केली. दहा ते पंधरा हजार रुपये स्टायपेंड देऊन युवक-युवतींना कामाचा अनुभव दिला. यापुढेही रोजगार मिळावे घेऊन नोकर भरती केली जाईल. सेल्फ हेल्प ग्रुपांच्या माध्यमातून पन्नास हजार महिला जोडल्या गेलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षात या महिलांनी ३४० कोटींची उलाढाल केली, असेही ते म्हणाले.

 

Web Title: will provide 5 thousand jobs in two years said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.