दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:35 IST2025-03-08T11:34:54+5:302025-03-08T11:35:53+5:30
भाजपतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात आगामी दोन वर्षात स्वयंसहाय गटांची संख्या ३२०० वरुन ५५०० केली जाणार आहे. तसेच महिला सदस्यांची संख्या ४२,००० वरुन एक लाखापेक्षा अधिक केली जाणार आहे. या स्वयंसहाय गटांची उलाढाल वार्षिक ६०० कोटींपर्यंत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. भाजपतर्फे आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे, आमदार डिलायला लोबो, सुलक्षणा सावंत, इतर भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणाले की, 'स्वयंसहाय गटांमार्फत महिला स्वालंबी झाल्या आहेत. या गटांतील महिलांना विविध व्यावसाय करायला प्राधान्य दिले जात आहेत. त्यामुळे या गटांची आर्थिक उलाढाल वाढली आहे. अधिकाधिक महिला आर्थिक सक्षम बनतील.
घरबरल्या रोजगारसंधी
मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यातील हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांत चांगले संवाद कौशल्य असलेल्या महिला घरी बसून आता पैसे कमावू शकतात. त्यासाठी सरकारने रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. साखळीत रोजगार मेळाव्यात काही महिलांनी नोंदणी केली. आता मडगाव, फोंडा, म्हापसा येथेही हे कार्यक्रम होत आहेत. तेथे महिलांनी नोंदणी करावी. महिला १५ ते १७ हजार रुपये कमवू शकतात.
स्वयंपूर्ण व्हा : नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे असे ते म्हणाले. आमदार डिलायल लोबो यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला जिल्हा पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. इतर विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.