कंत्राटदाराला बडतर्फ करून काळ्या यादीत टाकणार: मुख्यमंत्री; पैसाही न देता कला अकादमीची दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:43 IST2025-05-17T07:41:41+5:302025-05-17T07:43:02+5:30
सावंत म्हणाले की, दोन्ही समित्यांकडून आम्ही अहवाल घेतलेला आहे.

कंत्राटदाराला बडतर्फ करून काळ्या यादीत टाकणार: मुख्यमंत्री; पैसाही न देता कला अकादमीची दुरुस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला अकादमी नूतनीकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी कंत्राटदाराला बडतर्फ करून काळ्या यादीत टाकले जाईल. त्याआधी त्याच्याकडून एकही पैसा न देता दुरुस्तीचे काम करून घेतले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सावंत म्हणाले की, 'दोन्ही समित्यांकडून आम्ही अहवाल घेतलेला आहे. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना मी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच कंत्राटदाराकडून एकही पैसा न देता डागडुजीचे काम करून घेतले जाईल.
ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणार
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ज्या त्रुटी आहेत त्या ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेतल्या जातील. याबाबच अभियंत्यांकडूनही सल्ला घेतला आहे. त्यानंतर पुढे चार वर्षे कंत्राटदाराला ठेवण्यात येणार होते. परंतु कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले जाईल. सरकार या कंत्राटदाराला काही पैसेही देणे आहे. पूर्ण दुरुस्ती करून घेतल्याशिवाय शिक्षा म्हणून ही रक्कमही सरकार अडवणार आहे. मागील निविदेमध्ये जी कामे होती ती कंत्राटदाराने स्वखर्चाने करून द्यावी लागतील. निविदेमध्ये ज्या कामांचा समावेश नव्हता, त्या कामांबाबत मात्र नव्याने निविदा काढल्या जातील.
अहवाल अजून वाचलेला नाही
म्हादईचे पाणी वळविल्यास वन्यजीव किंवा मानवांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा जो अहवाल एनआयओने दिला आहे, त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की,' मी अद्याप हा अहवाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतर त्यावर भाष्य करीन.'