नव्या वर्षात घरांची सनद घेऊन येणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:02 IST2025-10-15T08:01:56+5:302025-10-15T08:02:37+5:30
राज्यभर 'माझे घर' योजनेच्या अर्जाचे वितरण; स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त

नव्या वर्षात घरांची सनद घेऊन येणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को/कुडचडे : सामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर बांधतो आणि ते त्याच्या पुढच्या पिढीला मिळावे हीच, त्याची इच्छा असते. गोव्यातील नागरिकांची सरकारी, कोमुनिदाद जागेतील अनधिकृत घरे कायदेशीर करावीत, यासाठी सरकारने पुढाकार घेऊन 'माझे घर' योजना तयार केली. या योजनेचे आता अर्ज वितरण केले जात आहे. जानेवारीत आम्ही घरे कायदेशीर करण्यासाठी लागणारी सनद घेऊन तुमच्यासमोर येऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
मुरगाव मतदारसंघातील नागरिकांना 'माझे घर' योजनेचे अर्ज वितरित करण्यासाठी बायणा येथे मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, सांगे, कुडचडे आदी ठिकाणीही काल अर्जाचे वितरण झाले. व्यासपीठावर आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी, बायणा रवींद्र भवन चेअरमन जयंत जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
एजंटगिरीला भुलू नका : मुख्यमंत्री
काही दिवसांपूर्वी केंद्रीय हमंत्री अमित शाह यांच्याहस्ते 'माझे घर' योजनेचे उद्घाटन करण्यात आले. आता संपूर्ण गोव्यात या योजनेच्या अर्जाचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. २०१४ पूर्वीची गोव्यातील घरे अनधिकृत आहेत ती कायदेशीर व्हावी, यासाठी 'माझे घर' योजना आणली. सुरुवातीला अनेकांनी याचे राजकीय भांडवल करत विरोध केला. या योजनेमुळे कायदेशीर होणार असलेल्या घरांपैकी ९५ टक्के घरे गोमंतकीयांची आहेत. आता काहीजण एजंट बनून तुमची घरे कायदेशीर करणार असल्याचे सांगून पुढे यायला सुरवात करतील. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
अर्ज कसे भरावेत ?
'माझे घर' योजने अंतर्गत दिलेले अर्ज कसे भरावेत, याबाबतही सरकार प्रतिनिधींकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आज आम्ही 'माझे घर' योजनेचे अर्ज देत असून जानेवारीत घर कायदेशीर करण्यासाठी लागणाऱ्या घरांच्या 'सनद' घेऊन येणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी आणि कोमुनिदाद जागेतील घरे कायदेशीर करण्यासाठी 'माझे घर' योजने अंतर्गत दिलेले अर्ज वेळेत भरून द्यावेत. आजपर्यंत गोमंतकीयांची अनधिकृत घरे कायदेशीर करण्याबाबतचा कधीच विचार केला गेला नाही. माझ्या सरकारने घरे कायदेशीर करण्याचा विचार करून 'माझे घर' योजना आणली.
मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट
आमदार संकल्प आमोणकर म्हणाले, सरकारी आणि कोमुनिदाद जागेत असलेली गोमंतकीयांची घरे कायदेशीर व्हावीत यासाठी 'माझे घर' योजनेचा शुभारंभकेला, याचे पूर्ण श्रेय मुख्यमंत्री सावंत यांनाच जाते. आपले घर आपल्या नावावर व्हावे, असे लोकांचे स्वप्न आता आमचे सरकार पूर्ण करत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी 'माझे घर' योजनेद्वारे संपूर्ण गोमंतकीयांना दिवाळीची एक मोठी भेट दिल्याचे आमोणकर म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी मुरगाव बायणा येथील कार्यक्रमात मतदारसंघातील नागरिकांना अर्ज वितरित केले. यावेळी सोबत आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी व इतर उपस्थित होते.