बिहारचे राज्यपाल गोव्याचे मुख्यमंत्री होणार? समर्थकांना विश्वास; RSS चा जोरदार पाठिंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2024 07:46 IST2024-12-23T07:42:54+5:302024-12-23T07:46:01+5:30
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आल्यास बिहारचे राज्यपाल तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच त्यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे.

बिहारचे राज्यपाल गोव्याचे मुख्यमंत्री होणार? समर्थकांना विश्वास; RSS चा जोरदार पाठिंबा!
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे अजून कोणताही प्रस्ताव पोहोचलेला नाही किंवा याबाबतीत पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे काही बोललेले नाहीत. मात्र, आर्लेकर यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव आल्यास राजेंद्र आर्लेकर तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला बहुतांश मंत्री व आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे.
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून ही जागा रिकामी करावी, बिहारमध्ये राज्यपाल असलेले गोमंतकीय सुपुत्र माजी सभापती तथा माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांना गोव्यात आणून मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे द्यावे व नंतर पेडणेहून त्यांना निवडून आणावे, असा प्रस्ताव भाजपच्या एका गटाने दिल्लीपर्यंत पोहोचवला होता. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेऊन प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले होते. परंतु, प्रवीण दिल्लीला गेले नसल्याची माहिती मिळते.
सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्याच आठवड्यात गोवा मुक्तिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर राजकीय चर्चेला गोव्यात उधाण आले. नंतर नेतृत्वपदासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे नाव पुढे आणण्यात आले.
राज्यात सध्या नोकऱ्या विक्री, भू-बळकाव ) प्रकरणातील कुख्यात संशयित सुलेमानचे कोठडीतून पलायन तसेच पोलिस, गुन्हेगार व राजकारण्यांमधील संगनमताचे प्रकरण गाजत आहे. सरकार यामुळे टीकेचे धनी बनले आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी जीत आरोलकर, दाजी साळकर व प्रेमेंद्र शेट या तीन आमदारांना सोबत घेऊन चार्टर विमानाने केलेला राजस्थान दौरा बराच गाजला. दुसरीकडे आर्लेकर यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे.
३० रोजी होणार पुन्हा चर्चा
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गेल्या काही दिवसांत गोव्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतलेला आहे. अनेक मंत्री, आमदार त्यांना भेटले आहेत. आता येत्या ३० रोजी भाजपची महत्त्वाची बैठक दिल्लीत होत असून, त्यावेळी गोव्यातील विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रवीण आर्लेकर नॉट रिचेबल
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठीनी आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले होते. परंतु ते गेले नाहीत अशी माहिती मिळते. रविवारी दिवसभर त्यांनी फोन कॉलही स्वीकारले नाहीत. त्यानंतर फोन स्विच ऑफ करून ते 'नॉट रिचेबल' होते. प्रवीण यांना आमदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्यात येणार असल्याच्या वृत्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.
अजून कोणताही प्रस्ताव नाही : राजेंद्र आर्लेकर
'लोकमत'ने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्याकडे अजून तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा पक्षश्रेष्ठी वगैरे माझ्याशी काही बोललेलेही नाहीत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास स्वीकारणार काय, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, अजून कोणताच प्रस्ताव नाही. त्यामुळे त्या नंतरच्या गोष्टी आहेत.