कविवर्य कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की- सत्कार हा वाढत्या वयाचा नव्हे तर वाढत्या कर्तृत्वाचा केला जायला हवा. एखाद्या नेत्याचे कर्तृत्व तो किती काळ राजकारणात आहे यावरून नाही, तर कमी काळात त्याने किती कर्तबगारी दाखवली यावर ठरत असते. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी होते. गोवा सरकारमध्ये सर्वोच्चपदी काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर आता पुन्हा ते आपल्याला शेवटचे एकदा आमदार व्हायचे आहे असे सांगतात, हे वाचून व ऐकून गोमंतकीयांचे मनोरंजन होत आहे.
दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व एकदा सीएम झालेल्या नेत्याने आपल्याला पुन्हा मांद्रेत आमदार व्हायचेच आहे, असा हट्ट धरणे थोडे आश्चर्याचेच वाटते. अर्थात पार्सेकर जर भाजपमध्ये असते तर तसा हट्ट धरता आला असता. मात्र ते भाजपमध्येदेखील नाहीत. तरीही अलीकडे ते आपण भाजप सोडून दुसऱ्या कोणत्याच पक्षात गेलो नाही, असे वारंवार लोकांना ऐकवतात. म्हणजेच ते भाजपमध्ये पुन्हा येऊ पाहतात, पण भाजप त्यांना घेत नाही हेदेखील स्पष्ट झाले आहे.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना एक शिक्षक म्हणूनही समाजात निश्चितच मान आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेचा डोलारा निश्चितच वाढवला आहे. शिक्षण विषयात त्यांना विशेष रस आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दोनवेळा पराभूत झाल्याने खरे तर सन्मानाने त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त होता आले असते. भाजप पक्ष सोडणे हीच त्यांची फार मोठी राजकीय चूक होती. कदाचित आता त्यांना त्याची जाणीव होत असावी, पण तशी कबुली ते देत नाहीत. तुम्ही भाजप सोडू नका, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केली होती, पण पार्सेकर यांनी भाजपला गेल्यावेळीच रामराम म्हटले. पण आता आपण एकदा आमदार होईन व मग रिटायर होईन, असे पार्सेकर सांगतात.
मांद्रे मतदारसंघात आपण जे विकास प्रकल्प सुरू केले होते, ते पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला आमदार व्हायचे आहे, असे पार्सेकर नमूद करतात. समजा पाच वर्षांसाठी ते आमदार झाले, तर सर्व प्रकल्प पाच वर्षांत मार्गी लागून पूर्ण होतील काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. प्रतापसिंग राणे किंवा दयानंद नार्वेकर, लुईझिन फालेरो यांची उदाहरणे येथे द्यावी लागतील. राणे अगदी सन्मानाने रिटायर झाले. ४८ ते ५० वर्षे विधानसभेत काढल्यानंतर राणे आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचेच आहे असे म्हणाले नाहीत. कारण बदललेला काळ आणि केंद्रातील नवी आक्रमक राजवट याचा अंदाज त्यांना योग्यवेळी आला. दयानंद नार्वेकर हळदोण्यात पराभूत झाले. मग लोकसभा निवडणूक लढविण्याची हास्यास्पद खेळी त्यांनी करून पाहिली. तिथे अपयश आल्यानंतर ते कायमचेच निवृत्त झाले.
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची चूक केली. तृणमूल काँग्रेसमध्ये गेले व राज्यसभा खासदार झाले, पण त्या पक्षासोबत त्यांचे पटले नाही. त्यांना अपमानास्पद पद्धतीने खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. शेवटी ते निवृत्त झाले. आपल्याला नावेलीत पुन्हा एकदा आमदार व्हायचे आहे असा हट्ट त्यांनी धरला नाही. रमाकांत खलप यांनी आपल्याला पुन्हा खासदार व्हायचे आहे असा हट्ट धरून पाहिला. पण काळ बदललाय, हे भाई खलपांनादेखील गेल्या लोकसभा निवडणुकीत कळून आले. कोणत्याच राजकीय नेत्याने तुम्ही आता रिटायर व्हा असे युवा पिढीने सांगेपर्यंत राजकारणात रेंगाळत राहू नये. स्वतःहून राजकीय क्षेत्राला गुडबाय करून सामाजिक क्षेत्रात वाहून घेता येते.
पूर्वीचा काळ आता राहिलेला नाही, आता निवडणुकीत अनेकजण जास्त पैसा खर्च करून निवडून येत असतात. शिवाय अनेक तरुणांना मतदार आता प्रथम संधी देतात. केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, दाजी साळकर अशी अनेक उदाहरणे पाहिल्यास कळून येतेच. पार्सेकर वगैरे मांद्रेत जिंकत होते, त्यात भारतीय जनता पक्षाचा वाटा मोठा असायचा. भाजपचे तिकीट हाती नसताना निवडणूक जिंकणे फार कठीण असते, याची जाणीव उत्पल पर्रीकर यांनादेखील झालेली आहे.