गोव्यासाठी असलेले पुण्यातील हरित लवादाचे पीठ कायम, आपकडून न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 20:35 IST2017-10-11T20:35:10+5:302017-10-11T20:35:48+5:30
गोव्यासाठी असलेले पुणे येथील हरित लवादाचे पीठ कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे.

गोव्यासाठी असलेले पुण्यातील हरित लवादाचे पीठ कायम, आपकडून न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत
पणजी : गोव्यासाठी असलेले पुणे येथील हरित लवादाचे पीठ कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे.
आपच्यावतीने पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मनोहर पर्रीकर यांच्या सरकारला चांगला धक्का बसला आहे. पुणे येथील हरित लवादाचे पीठ दिल्लीला हलविण्यासाठी मनोहर पर्रीकर सरकारचा प्रयत्न होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार तोंडावर आपटले असून, राज्यातील पर्यावरणवादी आणि पर्यावरण -हासाविरुद्ध सक्रिय काम करणा-या लोकांना अडथळा आणण्याचा सरकारचा डाव होता.
राज्यातील 60 टक्के दावे पुण्यातील लवादापुढे दाखल झालेले आहेत. त्यामुळे हरित लवादाचे पीठ गोव्यातच असावे, ही मागणी आप लावून धरेल, असेही गोम्स यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे गोव्यासाठी दिवाळी आणि ख्रिसमसची बेट आहे. गोव्यातील सामान्य जनतेला दिलासा देत न्यायालयाने आपली ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी दिली आहे.