युतीबाबत पुढील काळात विचार करू: दीपक ढवळीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 16:22 IST2025-01-26T16:21:50+5:302025-01-26T16:22:40+5:30
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक शनिवारी झाली.

युतीबाबत पुढील काळात विचार करू: दीपक ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक शनिवारी झाली. अलीकडेच ज्यांनी मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविरोधात विधाने केली, त्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. तसेच पेडण्याचे माजी आमदार परशुराम कोटकर यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बैठकीनंतर 'लोकमत'ला सांगितले की, भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे भाग्यविधाते ठरलेले आहेत. त्यांच्याविषयी केलेल्या विधानाचा मगोपच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मगो-भाजप युतीविषयीही बैठकीत चर्चा झाली. २०२२ सालापासून मगो पक्षाची दीपक ढवळीकर अध्यक्ष, मगोप भाजपासोबत युती आहेच. मगो पक्ष सत्तेत आहे. पुढील युतीविषयी मगोकडून पुढील काळात विचार केला जाईल. तूर्त आम्ही वेगळा कोणताच विचार केलेला नाही.
दरम्यान, आज पेडणे येथे परशुराम कोटकर यांना मगोकडून श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा होणार आहे.
बांदोडकरांनी अनेक चांगली कामे केली पण गोव्याच्या अस्मितेबाबत भाऊसाहेब जो विचार करत होते, तो चुकीचा होता व त्यामुळेच गोव्यात ओपिनियन पोल घ्यावा लागला होता, असे आमदार विजय सरदेसाई बोलले होते. त्यावर मगोपच्या बैठकीत चर्चा झाली. आपचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी 3 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची तुलना चक्क भाऊसाहेबांशी केली होती. त्याबाबतही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचे मगोपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. बांदोडकरांची तुलना कुणाशीच करता येत नाही, अशी भूमिका यापूर्वीच मगोपच्या एका नेत्याने मांडली आहे. बांदोडकर आता हयात नसले तरी, गोव्यातील बहुजनांचा अभिमान आज देखील बांदोडकर हेच आहेत, असे मगोप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.