आम्ही घरे सोडणार नाही!

By Admin | Updated: September 6, 2014 01:25 IST2014-09-06T01:21:44+5:302014-09-06T01:25:00+5:30

पणजी : सरकारने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देऊन कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ बायणा किनाऱ्यावरील रहिवाशांनी शुक्रवारी आल्तिनो

We will not leave homes! | आम्ही घरे सोडणार नाही!

आम्ही घरे सोडणार नाही!

पणजी : सरकारने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देऊन कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ बायणा किनाऱ्यावरील रहिवाशांनी शुक्रवारी आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. महिला, शाळकरी मुलेही मोर्चात सहभागी झाली होती. ‘सिटू’ या कामगार संघटनेच्या पुढाकाराने काढलेल्या या मोर्चाच्या वेळी आम्ही घरे सोडणार नाही, लष्कर आणले तरी प्राणपणाने लढू, असा इशारा संघटनेचे नेते अ‍ॅड. थालमन परेरा यांनी दिला.
दक्षिण गोव्याच्या ‘आप’च्या लोकसभा उमेदवार स्वाती केरकर, ‘उठ गोंयकारा’चे अ‍ॅड. जतीन नाईकही मोर्चात सहभागी झाले होते. कदंब बसस्थानकावरून सायंकाळी चारच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विदेश दौऱ्यावर असल्याने आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी थालमन परेरा म्हणाले की, बायणा सौंदर्यीकरण प्रकल्प म्हणजे मोठा रियल इस्टेट घोटाळाच आहे आणि यात राजकारणी गुंतलेले आहेत. त्सुनामी आल्यास घरातील लोकांना धोका आहे, अशी सबब देऊन ही घरे पाडण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे; परंतु प्रत्यक्षात वेगळेच कारण आहे. बायणा किनाऱ्यावर केवळ परप्रांतीयच नव्हे, तर स्थानिकही वास्तव्य करून आहेत. अनेकांचा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय आहे. त्यांना तेथून हटविल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचे काय? आधी या लोकांचे पुनर्वसन करा, नंतरच कारवाईच्या नोटिसा काढा, असे परेरा म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: We will not leave homes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.