महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 12:57 IST2025-02-07T12:55:49+5:302025-02-07T12:57:27+5:30
१२०० भाविकांना घेऊन पहिली रेल्वे रवाना

महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रयागराज महाकुंभसाठी गोव्यातून जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्यास गोव्यातील विषेश गाड्यांची संख्या आणखी वाढविली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना महाकुंभमेळ्यात सहभागी होता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गुरुवारी सकाळी करमळी रेल्वे स्थानकावरून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रवाना झाली. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री गोविंद गावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंबर कामत, आमदार राजेश फळदेसाई, रेल्वे अधिकारी आशा शेट्टी उपस्थित होत्या.
आता १३, २१ रोजी रेल्वे...
पहिल्या रेल्वेतून १२०० लोक महाकुंभमेळ्यासाठी गेले आहेत. आता दि. १३ व २१ रोजी पुन्हा विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. तसेच लोकांची गर्दी वाढल्यास आणखी वाढविल्या जातील. गोव्यातील भाविकांना महाकुंभचा अनुभव घेता यावा यासाठी ही मोफत रेल्वे सेवा सुरू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
४ हजार भाविकांना संधी
गोव्यातून निघालेली पहिली रेल्वे ८ रोजी प्रयागराजला पोहोचेल. भाविक संगमात पवित्र स्नान करून ९ रोजी परत प्रवास करतील. आतापर्यंत तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघातून टीम लीडर्सची नियुक्ती करण्यात आली आहे, जे प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची काळजी घेतील. गोव्यातून ४ हजार भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होतील, असेही फळदेसाई म्हणाले.