कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 09:43 IST2025-02-17T09:42:32+5:302025-02-17T09:43:15+5:30
आदिरंगोत्सव महोत्सवाचा समारोप

कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'आज आमच्या पारंपरिक गोष्टींचे महत्त्व आम्हालाच माहीत नाही, अशी स्थिती आहे. पिढीजात चालत आलेल्या आमच्या काही गोष्टींचे मूल्यमापन इतर लोक जाणून आहेत. आमची संस्कृती, परंपरा, आमचे पारंपरिक उद्योग, व्यवसाय व त्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे महत्त्व जाणून घेण्याची गरज आहे. याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही केंद्र सरकारच्या सहकार्यातून 'कुणबी व्हिलेज' ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
भूमिपुत्र सेवा संघटनेने आयोजित केलेल्या आदिरंगोत्सव कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, हस्तकला महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, भूमिपुत्र सेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
विकासाचे स्वप्न
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आज प्रत्येक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे. क्रांतिकारक समाज परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सुविधा निर्माण करत आहोत. युवकांच्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या तर पंतप्रधानांचे विकसित भारत हे स्वप्न सत्यात उतरेल.'
अंत्योदय तत्त्वावर काम
मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी राजकारणात सक्रिय आहे, ते स्वतःसाठी नाही तर अंत्योदय तत्त्वावर काम करण्यासाठी. तळागाळातील शेवटची व्यक्ती वंचित राहणार नाही, यासाठी लक्ष देत आहे. सरकारचा प्रत्येक घटक हा सामान्य लोकांसाठी झटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आज विकास व परंपरा या दोन गोष्टींवर भर देत आहेत.'
सामान्य लोकांचा विचार करा
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'जीवन जगत असताना फक्त घेणे ही वृत्ती बदलायची वेळ आली आहे. आजघडीला आपण समाजाला व समाजातील प्रत्येक घटकाला काय देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. त्याचवेळी अंत्योदय तत्त्वावर माणुसकीचे जतन केले जावे, या विचाराला प्राधान्य द्या. आज आरक्षणाच्या माध्यमातून जे लोक उच्च पदावर पोहोचले आहेत, त्यांनी आपल्या अधिकारपदाचा वापर हा आपल्या समाजातील लोकांबरोबरच, सामान्य लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा. समाजाचा उद्धार करत असताना आपले कुटुंब, आपले आप्तेष्ट यांचा फक्त विचार करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा.'
आदिवासी परंपरेचा गौरव
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'बिरसा मुंडा यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याचे काम आम्ही केले आहे. दहा वर्षांपूर्वी बिरसा मुंडांचे नाव क्वचितच कुणाला माहीत होते. आदिवासी परंपरा ही आमची राष्ट्रीय परंपरा आहे हे ठळकपणे आज कार्यक्रमाद्वारे आम्ही दाखवून देत आहोत. आमच्या उज्ज्वल चालीरिती सांभाळून विकास आम्ही घडवत आहोत. हे सर्व करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञान बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत.