लंकेच्या संरक्षण सचिवाची गोवा शिपयार्डला भेट, अद्ययावत गस्ती नौकेच्या बांधकामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 20:44 IST2018-01-11T20:44:16+5:302018-01-11T20:44:30+5:30
वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये श्रीलंकेसाठी अद्ययावत गस्ती नौकेचे बांधकाम चालले असून, गुरुवारी लंकेचे संरक्षण सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.

लंकेच्या संरक्षण सचिवाची गोवा शिपयार्डला भेट, अद्ययावत गस्ती नौकेच्या बांधकामाची पाहणी
पणजी : वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये श्रीलंकेसाठी अद्ययावत गस्ती नौकेचे बांधकाम चालले असून, गुरुवारी लंकेचे संरक्षण सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. श्रीलंका लष्कराचे कमांडर, नौदल महासंचालक, तटरक्षक महासंचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिका-यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. गोवा शिपयार्डचे चेअरमन रिअर अॅडमिरल शेखर मित्तल यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा करून बांधकामाची माहिती घेतली.
लंकेसाठी गोवा शिपयार्डमध्ये बांधली जाणारी ही दुसरी मोठी गस्तीनौका आहे. पहिली गस्तीनौका निर्धारित मुदतीआधीच बांधकाम पूर्ण करून लंकेकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर २ आॅगस्ट २0१७ रोजी लंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या नौकेचे अनावरणही केले होते. उत्कृष्ट बांधकामाच्या बाबतीत गोवा शिपयार्डबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले होते.
दरम्यान, भारतीय नौदलासाठी दक्षिण कोरियाच्या कांगनम कॉर्पोरेशनशी संयुक्त विद्यमाने बांधण्यात यावयाच्या १२ मोठ्या युद्धनौकांबाबतच्या (माइनस्वीपर) वाटाघाटी निविदा प्रक्रियेतील दोषामुळे अयशस्वी ठरल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. निविदेमध्ये चूक होती ती या टप्प्यावर दुरुस्त करणे कठीण आहे. तंत्रज्ञान भागीदारासाठी नव्याने रिक्वेस्ट फॉर प्रोपोझल काढल्यानंतरच भागीदार निवडून या १२ नौका बांधण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
हे काम आठ ते दहा वर्षांत पूर्ण करायचे आहे, त्यामुळे एक ते दोन वर्षांचा विलंब लागला तरी हरकत नाही, असे पर्रीकर यांचे मत आहे. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असताना तब्बल ३२ हजार कोटींच्या कामांचे कंत्राट गोवा शिपयार्डला देण्यात आलेले आहे. यामुळे शिपयार्डचे कामही वाढले आहे.