३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 07:41 IST2025-02-25T07:40:51+5:302025-02-25T07:41:14+5:30
कर्करोगाच्या बाबतीत निदानासाठी 'फाउंडेशन वन' चाचणी मोफत उपलब्ध करण्यात येणार

३ लाखांची चाचणी मोफत; कर्करोग निदानासाठीची 'फाउंडेशन वन' टेस्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:कर्करोगाच्या बाबतीत निदानासाठी 'फाउंडेशन वन' चाचणी मोफत उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी सरकारने एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडे हातमिळवणी केली आहे. बायोप्सी किंवा इतर नमुने अमेरिकेत तपासून त्याचे अहवाल आठवडाभरात प्राप्त होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, 'फाउंडेशन वन' चाचणी खाजगी इस्पितळांमध्ये केल्यास दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. सीएसआर अंतर्गत खाजगी कंपनीकडून हे काम होणार आहे. ही कंपनी गेली १८ ते २० वर्षे गोमेकॉत सरकारला सेवा देत आहे. कर्करोगाचे काही प्रकार गुंतागुंतीचे असतात. 'फाउंडेशन वन' ही चाचणी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
दरम्यान, 'दक्षिण जिल्हा इस्पितळात एंजिओग्राफी तसेच नेफ्रॉलॉजी विभागाच्या आवश्यकता आहे, तो विभाग सुरू केला जाईल. सर्व प्राथमिक केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. जेणेकरून तेथील कर्मचारी काम करतात की नाही, हे इंटेग्रेटेड डॅशबोर्डवर आम्हाला समजेल. कामचुकारपणा केल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.
उपकेंद्रांत २१ प्रकारच्या रक्तचाचण्या
मंत्री राणे म्हणाले की,' राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये २१ प्रकारच्या रक्तचाचण्या करण्याची सोय पुढील तीन महिन्यात केली जाईल. रुग्णवाहिकांच्या बाबतीतही प्रस्ताव तयार आहे. गोमेकॉत तसेच दोन्ही जिल्हा इस्पितळांमध्ये रक्त तपासणीच्यावेळी कर्करोगाचीही चाचणी केली जाईल. त्यामुळे अशा रुग्णांचा डेटाबेस तयार करणे सरकारला सोपे होईल. आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारात पोहोचली पाहिजे व त्यादृष्टीने सरकारचे काम चालू आहे. राज्यात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बाब सरकारने गंभीरपणे घेतली आहे. कर्करोग निदानासाठी सध्या राज्यात ठिकठिकाणी चालू असलेल्या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.'
१२०० कोटींचे प्रोटॉल थिएरपी मशीन
विश्वजित म्हणाले की, बांबोळी येथे बांधण्यात येत असलेल्या कॅन्सर इस्पितळात १२०० कोटी रुपये किमतीचे प्रोटॉल थिएरपी मशीन आणले जाईल. ते हाताळण्यासाठी मनुष्यबळही तयार करावे लागेल. निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून निधी मंजूर करून घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.