विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर विजय सरदेसाई संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:24 IST2025-07-14T09:23:29+5:302025-07-14T09:24:11+5:30
प्रश्न विचारण्याची कालमर्यादा संपल्यानंतर बैठक आयोजनाबद्दल टीका

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर विजय सरदेसाई संतापले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विरोधी आमदारांमध्ये एकवाक्यता नाही, हे वेळोवेळी दिसून येत असतानाच हा दुरावा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी बैठक बोलावल्यानेसंयुक्त विरोधकांमधील गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्यावर टीका केली.
येत्या २१ पासून सुरू होणार असलेल्या विधानसभा अधिवेशनासाठी तारांकित व अतारांकित प्रश्न विचारण्याची कालमर्यादा आज सोमवारी संपते. शिवाय खासगी विधेयके व ठराव सादर करण्याची पहिली फेरीही संपलेली आहे. मग मंगळवारच्या बैठकीला अर्थच काय?, असा सवाल सरदेसाईनी केला. ते म्हणाले, 'अधिवेशनाची तारीख अधिसूचित केली जाते तेव्हा १५ दिवसांची मुदत असतेच. अधिसूचना आल्यावर विरोधी पक्षनेत्याने रणनीती संयुक्त ठरवण्यासाठी ताबडतोब विरोधकांची बैठक बोलावणे अपेक्षित असते. प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत तसेच काही काळ मायकल लोबो विरोधी पक्षनेते असताना त्यांच्यासोबत मी काम केले. ही प्रथा ते न चुकता पाळत असत.'
काय ठरवणार?
सरदेसाई म्हणाले की, 'सभापतींनी कामकाज सल्लाकार समितीची बैठकही केवळ सोपस्कार म्हणून पार पाडली. तसाच काहीसा प्रकार युरींनी केला आहे. मंगळवारी बैठकीला जावे की नाही, हे मी अजून ठरवलेले नाही. आता कसले कपाळाचे धोरण ठरवणार?'
आता बैठक कशाला?
सरदेसाई म्हणाले की, 'पावसाळी अधिवेशन मोठे असते. तारांकित किंवा अतारांकित प्रश्न विधिमंडळ खात्याकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधी विरोधी पक्षनेत्याने बैठक घ्यायला हवी. राज्यात अनेक ज्वलंत विषय आहेत. त्यावर चर्चा करून रणनीती ठरवायला हवी; परंतु याबद्दल विरोधी पक्षनेत्याकडून निरुत्साह दिसून आला. आज सोमवारी प्रक्रिया संपत आहे. मंगळवारी बैठक बोलावण्याचे प्रयोजन काय?'