पहिलाच काजू महोत्सव ठरला लक्षवेधी! विविध खाद्यपदार्थांची मेजवानी गोमंतकीयांना भावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 09:47 IST2023-04-17T09:46:38+5:302023-04-17T09:47:22+5:30
योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिलाच काजू महोत्सव ठरला लक्षवेधी! विविध खाद्यपदार्थांची मेजवानी गोमंतकीयांना भावली
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राजधानीत आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या काजू महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने लोकांनी कांपाल मैदानावरील या महोत्सवास भेट देत येथील स्टॉल्स व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला आहे.
महोत्सवात ५० पेक्षा अधिक काजूशी निगडित स्टॉल्स थाटण्यात आले होते. काजू, निरो, फेनीचे स्टॉल लक्षवेधी ठरले. तसेच अनेक स्टॉल्सच्या माध्यमातून काजूचे महत्त्व आणि उपयोगाबद्दल सांगण्यात येत होते. ग्रामीण भागातील लोक जे काजू लागवड करतात, त्यांचेच सर्वाधिक स्टॉल्स येथे पाहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेला अनुभवही त्यांनी यावेळी लोकांना सांगितला. दरम्यान, काजू महोत्सवात खाद्य पदार्थांचेच जास्त स्टॉल्स होते. या स्टॉल्समध्ये काजूपासून तयार केलेले दूध, काजू बटर, काजू दही याचबरोबर चॉकलेट्स, बिस्किटे, काजू ज्यूस, काजू विनीगर, स्वॉश हे पाहायला मिळाले. तसेच यासोबत शिजवलेल्या अन्नात काजूचा उपयोग कशाप्रकारे करता येईल हे पाहायला मिळाले.
काही स्टॉल्सवर काजू मॅक आणि चीज, रागी आणि काजूचे मिश्रण असलेले खेकड्याचे कालवण, काजू फ्रूट सालाद, निरोचा वापर करून करण्यात आलेले चिकन, काजू निरो आइस्क्रीम, काजू कोलांडा, काजू उर्राक व अननसपासून बनवलेले पेयजल यांचा समावेश आहे.
योजनांची माहिती देणारे स्टॉल्स
कृषी खात्यासोबत, वन खात्याचे, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खाते, हस्तकला महामंडळ यांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले होते. हे सर्व स्टॉल्स खासकरून लोकांना माहिती देण्यासाठीच ठेवण्यात आले होते. या स्टॉल्स अंतर्गत काजूची विविध प्रजाती, सरकारी योजना, उद्योग क्षेत्रातील काजूचे महत्त्व याबाबत लोकांना, शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषी खात्यातर्फे काजू तयार होण्याची संपूर्ण प्रक्रियादेखील दाखविण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"