मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:31 IST2025-11-14T07:31:38+5:302025-11-14T07:31:38+5:30

उमेदवारांची निवड प्रकिया सुरू केली आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी दिली.

utpal parrikar panel for municipal elections goa testing begins to field candidates in all wards | मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू

मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजधानी पणजीत स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवून कामे केली जात आहेत. स्थानिक आमदार, महापौरांकडून लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पणजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आम्ही सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उमेदवारांची निवड प्रकिया सुरू केली आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी दिली.

एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पर्रीकर म्हणाले की, 'सध्या पणजीत महानगरपालिकेतील काही विद्यमान नगरसेवक कोणत्याच विषयावर बोलताना दिसत नाहीत. ते बैठकीत गप्प बसून असतात. ते कोणाच्या दबावाखाली गप्प राहतात की त्यांना काम करायचे नाही हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे जे लोक पणजीतील नागरिकांच्या समस्या मांडतात, सोडवतात अशा लोकांना आता आम्हाला निवडून आणायचे आहे. यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे.

स्थानिक आमदार अपयशी

स्थानिक आमदारांना पणजीतील समस्यांचे काहीच देणे-घेणे नाही. स्मार्ट सिटीच्या कामांतील बेजबाबदारपणाबद्दल वेळोवेळी आम्ही आवाज उठवला. त्यामुळे आता काही प्रमाणात वेळेवर कामे केली जात आहेत. राजधानीत बेकायदेशीर 'स्पा' विषयी आवाज उठविल्याच्या विषयावर आमदार पत्रकारांवर भडकले. खरेतर, हा विषय आमदारांनी सोडवायला पाहिजे होता. आमदार फक्त आपले व्यावसायिक हित जोपासत आहेत. पणजीवासीयांना अंधारात ठेवत काही प्रकल्प आणले जात आहेत. स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी आवाज उठवायला हवा. तरच समस्या सुटतील.

'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी करा

पूजा नाईकने जे नोकरी विक्रीचे आरोप केले आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी. नोकरी विक्री ही गरीब, बेरोजगार युवकांची थट्टाच आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.
 

Web Title: utpal parrikar panel for municipal elections goa testing begins to field candidates in all wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.