हजार अडथळ्यांवर मात करण्याची ताकद 'उटा' कार्यकर्त्यांत : आमदार गोविंद गावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:54 IST2025-07-11T11:53:43+5:302025-07-11T11:54:48+5:30

जी काही बंदी आणलेली आहे तिला आव्हान देण्याची तयारी प्रत्येकाने ठेवलेली आहे.

uta activists have the strength to overcome a thousand obstacles said mla govind gawde | हजार अडथळ्यांवर मात करण्याची ताकद 'उटा' कार्यकर्त्यांत : आमदार गोविंद गावडे

हजार अडथळ्यांवर मात करण्याची ताकद 'उटा' कार्यकर्त्यांत : आमदार गोविंद गावडे

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'उटा' संघटनेवर बंदी नेमकी का आणली, कोणत्या कलमाखाली आणली याचे आम्हाला ज्ञान नाही. परंतु, मला राज्यातील जनतेला सांगावेसे वाटते की, उटा ही काही गर्भश्रीमंत संघटना नाही. 'उटा'कडे मुबलक पैसा अथवा स्वतःचे कार्यालय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांचे घर हेच त्यांचे कार्यालय आहे. असे असतानाही संघटनेवर का बंदी आणली जाते याचे उत्तर आगामी काळात नक्कीच मिळेल. येणारा काळच त्यावर निर्णय देईल, अशी प्रतिक्रिया प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी व्यक्त केली आहे.

प्रियोळ मतदार संघातील विकासकामांना सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी आमदार गावडे यांना 'उटा 'संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना ते बोलत होते. गावडे म्हणाले की, जे काही घडले आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते अजिबात डगमगलेले नाहीत. जी काही बंदी आणलेली आहे तिला आव्हान देण्याची तयारी प्रत्येकाने ठेवलेली आहे.

'उटा'च्या अध्यक्षांनी या गोष्टीचे समर्थनसुद्धा केलेले आहे. 'उटा'ने नेहमी फक्त आदिवासी समाजबांधवांचाच विचार केला असे नाही तर इतर गोरगरीब बांधवांचादेखील विचार केलेला आहे. आपल्याबरोबर इतरांचेही कसे भले होईल याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने नेहमी केलेला आहे. 'उटा'च्या अथक प्रयत्नांतूनच ग्रामीण भागातील गरीब बांधवाला वनहक्क मिळालेला आहे, असे गावडे यावेळी बोलताना म्हणाले.

आज उटा हा शब्द गोमंतकातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आहे. कितीही बंदी आणल्या तरी जनतेचे आमच्यावरील प्रेम कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्या सर्व आव्हानावर मात करण्याची ताकद उटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात आहे. जोपर्यंत आमच्या ध्येयधोरणांपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत आमचे कार्य हे चालूच राहणार आहे.

'त्यांना' योग्यवेळी ताकद कळेल

काही राजकारणी प्रियोळ मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देताना गोविंद गावडे म्हणाले, की त्यावर मी आता तरी काहीच भाष्य करणार नाही परंतु वेळ येईल त्यावेळी लोकांसमोर सत्य काय ते नक्कीच मांडेन. जे नेते येत आहेत त्यांची ताकद काय आहे हे योग्यवेळी त्यांना स्वतःलाच समजून येईल. 'उटा' ही केवळ एक सामान्य संस्था नसून एक चळवळ आहे, हे पुन्हा एकदा निक्षून सांगत आहोत, असे आमदार गावडे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी संस्थेने केलेल्या संघर्षाच्या आठवणीही सांगितल्या.

 

Web Title: uta activists have the strength to overcome a thousand obstacles said mla govind gawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.