'स्मार्ट कार्ड' वापरा, दहा टक्के सवलत मिळवा! कदंब महामंडळाच्या बस गाड्यांसाठी नवीन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 13:56 IST2024-12-19T13:54:59+5:302024-12-19T13:56:12+5:30
राज्यात सर्वत्र कदंब व 'माझी बस' योजनेतील बस गाड्यांसाठी हे कार्ड वापरता येईल.

'स्मार्ट कार्ड' वापरा, दहा टक्के सवलत मिळवा! कदंब महामंडळाच्या बस गाड्यांसाठी नवीन उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कदंब महामंडळाच्या बस गाड्यांसाठी 'स्मार्ट ट्रान्झिट कार्ड' जारी करण्यात आले आहे. हे कार्ड वापरल्यास प्रवाशांना तिकीट दरात १० टक्के सवलत दिली जाईल. राज्यात सर्वत्र कदंब व 'माझी बस' योजनेतील बस गाड्यांसाठी हे कार्ड वापरता येईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी या योजनेचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे चेअरमन आमदार उल्हास तुयेकर, वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक, व्यवस्थापकीय संचालक पुंडलिक खोर्जुवेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्ट कार्ड आतापर्यंत केवळ पणजीतील इलेक्ट्रिकल बसगाड्यांसाठीच लागू होते, ते आता राज्यभर कदंबच्या सर्व बसगाड्यांना लागू होईल. तसेच 'माझी बस' योजनेखाली ज्या खासगी बसेस कदंबने चालवायला घेतल्या आहेत. त्या गाड्यांनाही ते लागू होईल.
कार्डची किंमत १५० रुपये आहे. परंतु प्रवाशांना ते मोफत दिले जात आहे. दीडशे रुपये भरल्यानंतर तेवढ्या रकमेचा प्रवास या कार्डवर करता येईल. म्हणजे प्रवाशांना ते फुकट दिल्यासारखेच आहे. हे कार्ड ठरावीक रक्कम भरून रिचार्ज केल्यानंतर गोव्यात कुठेही दहा टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. पंधरा दिवस ट्रायल घेतल्यानंतर कदंबच्या आंतरराज्य बसगाड्यांनाही हे कार्ड लागू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
५० टक्के सवलत
ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना तिकिटावर ५० टक्के सवलत या कार्डद्वारे मिळणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना हे कार्ड अनिवार्य असेल. प्रवाशांनी रिचार्ज केल्यानंतर कार्डवरील रक्कम विनावापर राहिल्यास पुढील महिन्यात वापरता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुटुंबात जर एकापेक्षा जास्त व्यक्ती बसने प्रवास करीत असेल तर कुटुंबही हे कार्ड वापरू शकेल.
प्रवासासाठी बस वापरा
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील लोकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. दुचाकी किंवा चारचाकी रस्त्यावर आणण्याचे शक्यतो टाळावे, यासाठी विविध उपाययोजना सरकार राबवत आहे. रोज कामावर जाणारे औद्योगिक कर्मचारी, खासगी आस्थापनातील तसेच सरकारी कर्मचारी यांना या कार्डचा फायदा होणार आहे. तिकिटाच्या दरात १० टक्के सवलत मिळणार असल्याने पैसे वाचतील.