दोघा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून
By Admin | Updated: June 27, 2014 01:36 IST2014-06-27T01:30:54+5:302014-06-27T01:36:08+5:30
सावर्डे : दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सावर्डे, गुड्डेमळ येथील प्रशाल प्रदीप देवीदास (२२, रा. गुड्डेमळ) असे मृताचे नाव आहे.

दोघा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून
सावर्डे : दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सावर्डे, गुड्डेमळ येथील प्रशाल प्रदीप देवीदास (२२, रा. गुड्डेमळ) असे मृताचे नाव आहे. संशयितांची रवानगी उद्या अपना घर येथे करण्यात येणार आहे.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशाल १५ जूनला संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी, मित्रमंडळींनी १५ जूनला चौकशी केली आणि १७ रोजी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात २४ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फोनवरून एका मृतदेहाबाबत माहिती मिळाली. गुड्डेमळ येथील दाट जंगलात हा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. मृतदेहाजवळ कमरेचा पट्टा सापडला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
आपला संशय येऊ नये यासाठी खून करणाऱ्यांनीच गावात जाऊन जंगलात मृतदेह दिसल्याची माहिती प्रथम दिली. गावातील एकाने पोलिसांना फोन केला. विशेष म्हणजे मृतदेहाचा पोलीस पंचनामा करीत होते, तेव्हा संशयित मृतदेहाजवळ होते. आपण बांबूची झाडे कापण्यासाठी जंगलातून जाताना मृतदेह पाहिल्याची माहिती त्यांनी दिली होती. पोलिसांनी सुमारे २० जणांचे जबाब घेतले, पैकी १० नोंद केले. संशयितांची चार दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती. अखेर ते आज संध्याकाळी कबूल झाले.
काही कारणावरून प्रशालच्या घरी भांडण सुरू होते. त्यात संशयितांनी मध्यस्थी केलेली. तेव्हा प्रशाल याने संशयितांना मारलेले. त्याचा काटा काढण्याचा या मुलांचा डाव होता. रविवारी १५ जून रोजी प्रशाल दारूच्या नशेत घराकडे जाताना वाटेत संशयित भेटले आणि त्याला जंगलात घेऊन गेले. तेथे संशयितांनी त्याच्याच कमरेचा पट्टा त्याच्या गळ््यात आवळून खून केला आणि पसार झाले. यानंतर एका संशयिताने दुसऱ्या संशयिताला माहिती उघड केल्यास ठार मारण्याची धमकीही दिलेली. (प्रतिनिधी)