मापा पंचवाडी येथे झालेल्या अपघातात दोन ठार पाच गंभीर जखमी
By आप्पा बुवा | Updated: May 22, 2023 20:00 IST2023-05-22T19:59:02+5:302023-05-22T20:00:02+5:30
नातेवाईकांना घरी सोडायला जाताना गाठले काळाने

मापा पंचवाडी येथे झालेल्या अपघातात दोन ठार पाच गंभीर जखमी
अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: रिवण सांगे येथे नातेवाईकांना सोडायला जाताना कारने बाजूच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन ठार झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी होण्याची घटना मापा पंचवाडी येथे सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली आहे.
सविस्तर वृत्तानुसार पाज शिरोडा येथील महादेव नाईक हे आपल्या काही नातेवाईक व मित्रमंडळींबरोबर दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. काल रात्री उशिरा शिर्डीहून ते पाज शिरोडा येथे घरी पोहोचले. रिवण सांगे येथील त्यांचे काही नातेवाईक सुद्धा त्यांच्याबरोबर शिर्डीला गेले होते.रात्री सगळेजण पाज शिरोडा येथे झोपले. सदर नातेवाईकांना सोमवारी सकाळी सोडायला म्हणून महादेव नाईक जात होते. यावेळेस महादेव नाईक यांचे कुटुंबीय गाडीत बसले.वळणा वळणाच्या रस्त्यावर मापा येथे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला व गाडीने सरळ बाजूला असलेल्या सागवानच्या झाडाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की गाडीचा चक्काचूर झाला.
अपघात झाला त्यावेळी महादेव नाईक हे गाडी चालवत होते तर त्यांचा मुलगा सिद्धम महादेव नाईक (वय 11) हा पुढे बसला होता. सदर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला .रेशम राजेंद्र नाईक (वय 18 ,राहणार रिवण) ही सुद्धा सदर अपघातात गंभीर जखमी झाली होती. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार चालू असतानाच तिला मृत्यू आला . सदर अपघातात महादेव नाईक ( शिरोडा), पूर्वा महादेव नाईक( शिरोडा), सौम्या महादेव नाईक( वय सात शिरोडा.), राधिका राजेश नाईक ( वय 52,रिवण सांगे), रोहिणी नाईक (वय 22,रिवण सांगे) हे पाच जण ह्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
त्यापैकी राधिका नाईक यांच्यावर जी एम सी मध्ये उपचार चालू आहेत तर इतर चार जणांवर मडगाव येथील अस्पिसिओ ईस्पितळात उपचार चालू आहेत. हवालदार अजित गावडे यांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे पुढील तपास करत आहेत.